दहिवडी | खटाव तालुक्यातील एका तडीपार गुंडाने आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपक नामदेव मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) असे तडीपार गुंडाचे नांव आहे.
दीपक मसुगडे यांच्यावर पुसेगाव, दहिवडी, फलटण, कोरेगाव या परिसरात मोठी दहशत होती. त्याच्यावर जबरी चोरीचे, घरफोडीचा, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी व चोरी असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिस अधीक्षकांनी माण, खटाव, कोरेगाव व फलटण या चार तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार केले होते.
तडीपार कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून तो सत्रेवाडी (ता. माण) येथे आल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर, सहायक पोलिस फौजदार अशोक हजारे, पोलिस हवालदार संजय केंगले, पोलिस नाईक रवींद्र बनसोडे व प्रमोद कदम यांनी ही कारवाई केली.