तमाशाला ४ वर्ष पूर्ण
चित्रपट परिक्षण | तीच ती असूनसुद्धा वेगळी आणि आपलीशी वाटणारी कथा, एक प्रसिद्ध दिग्दर्शक, दोन सुप्रसिद्ध ऍक्टर्स, त्यांचा सहज अभिनय, मोठ्ठा निर्माता, चांगलं बजेट, खूप प्रमोशन आणि म्यूझिकल मायस्ट्रोचे संगीत पण तरीही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला हा चित्रपट, ‘तमाशा’.
या चित्रपटाविषयी लिहावंसं वाटलं, कारण आज ‘तमाशा’ला ४ वर्षे पूर्ण होतायत, या चित्रपटात काय कमी होती ते आजही समजलेलं नाही. इम्तियाज अलीने आपल्या सरणीला साजेशी कथा लिहली. त्याच्या प्रमाणेच गोष्टींच्या आणि पात्रांच्या प्रेमात असलेला नायक ‘वेद’ जो लहानपणापासूनच खूप रमून गोष्टी ऐकत असतो, तो त्याच त्या सामाजिक पेचात अडकून तीच ती इंजिनीरिंगची नोकरी करु लागतो, सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात, त्यामुळे तोही त्या नोकरीत समाधानी असतो. हे नोकरीच रुटीन रटाळ व्हायला लागल्यावर तो फिरायला कोर्सिकाला जातो, तिथे त्याला ‘तारा’ भेटते. तारा तिला स्वतःला आवडणारी नोकरी करतेय. तिला वेगळंच पात्र वठवत असलेला वेद भेटतो, ते ठरवतात की आपण दोघांनी स्वतःविषयी काहीही खरं बोलायचं नाही. जजमेंटची भीती जाते, दोघेही खूप मजा करतात. त्यात तारा त्याच्या प्रेमात पडते.
वेद परत भारतात आल्यावर त्याचं तेच ते रुटीन सुरू होतं. पण तिकडे ताराला वेद बद्दल काहीच माहिती नसल्याने तिला त्याला शोधायला बाहेर पडते, त्याच त्या खऱ्या प्रेमाखातर. त्यासाठी तिला 4 वर्षे लागतात. भेटल्यावर वेदही तिच्या प्रेमात पडतो, आणि तिला लग्नासाठी मागणी घालतो. ताराला कळून चुकतं की हा वेद तिला भेटलेल्या वेदपेक्षा खूप वेगळा आहे, ती त्याला नकार देते. नकार सहन न होऊन वेद चिडचिड करू लागतो. आपल्याला आवडणारं आयुष्य जगणारा वेद त्याच्या आतच आहे, हे तारा त्याला बोलून दाखवते. कारण ती त्याच्या प्रेमात अडकलीय. त्यात वेदचा ताराला संबोधून एक संवाद आहे की, “वेडे तू तर प्रेमात पडलीयस…. पण कुना दुसऱ्याच्या!” परिणाम म्हणून वेद जॉबच्या ठिकाणी कसाही वागू लागतो. त्याला आता तशा ठिकाणी थांबता येणार नसतं, आणि तो सगळं बदलण्यासाठी त्याच्यासाठी ‘सर्वकाही’ असलेल्या नोकरीला लाथ मारतो. पुढे चित्रपट तुम्हीच बघा, त्यातली पूर्ण मजा नाही घालवत.
ऑफिस मधले काही सिन, जसे प्रेझेंटेशन, बॉस सोबतचा वाद बऱ्याच काळासाठी मनात राहतो.
एकूणच ही लोव्हस्टोरी कमी आणि ‘स्व’चा शोध घेणारी कथा जास्त आहे. मेन स्ट्रिम बॉलीवूडसाठी ती ट्रॅडिशनल असूनही वेगळी आहे. इम्तियाजच्या इतर चित्रपटांप्रमाणे (सोचा ना था, जब वी मेट, रॉकस्टार, हायवे) या चित्रपटातही प्रवास आहे. पात्र, गोष्टी, संगीत सगळंच या प्रवासांनंतर बदलतं.
सध्याच्या ‘युथ’साठी, त्यांच्या अडचणींशी साम्य सांगणारा प्रेरणादायी चित्रपट, ए आर रहमानच्या साजेस्या संगीताने नटलेला आहे. रणबीर कपूर आणि दीपिका या लाईमलाईट फेव्हरेट जोडीने हा चित्रपट अभिनित केला. रवि वर्मनची सिनेमॅटोग्राफीही खास दिसते. इम्तियाजचे डायलॉग लक्षात राहतात,
जसे वेद म्हणतो “सगळे पळतायत म्हणून मी पण पाळतोय”
आणि “एक हिरो होता, त्याने खूप मेहनतीने इंजिनिअरिंग पूर्ण केली, नोकरी मिळवली आणि नोकरी करत करत एक दिवस मरून गेला… तुम्हाला शेवट नाही आवडला? तर मग तो बदला!”
हे संवाद मला आजही इन्सपायर करतात. पण तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप झाला.
आज यशस्वी चित्रपटाची व्याख्या 100 नी 200 करोड ने होत असली तरी माझ्यासाठी जी कलाकृती खूप काळासाठी आपली छाप मागे सोडते, जी कधीही अनुभवली तरी तितकीच भावते, तीच कलाकृती सक्सेससफुल आहे. आज चार वर्षांनंतरही ‘तमाशा’ मला आठवतो आणि रटाळ मेनस्ट्रीम बॉलीवूडकडून थोडया का होईनात आशा पल्लवित करतो. संधी मिळाली तर नक्की बघा.