माझ्या आठवणीतील शिक्षक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिक्षकदिन विशेष | अक्षय चंद्रकांत फडतरे (इनामदार), संध्या जाधव

पाचवीच वर्ष पूर्ण झालं. पुढील शिक्षणासाठी मी आणि माझा मित्रांनी गावातील high school म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल, जिहे इथे admission घेतलं. मी नेहमीच या शाळेबद्दल,इथल्या शिक्षाकांबद्दल माझा मोठ्या भावांकडून आणि मित्रांकडून ऐकत आलेलो होतो. मुख्याध्यापक सूर्यवंशी सर ते नाना शिपाई पर्यंतचा सर्व स्टाफ ओळखीचाच होता. शाळेत शिकत असताना बऱ्यापैकी सर्वांनाच गणित हा सर्वात कठीण विषय वाटत असतो. असा कठीण ,भयंकर ,भीतीदायक विषय शिकवणारे शिक्षक म्हणजे आमचे केंजळे सर. केंजळे सर हे कटापूर म्हणजे आमच्या शेजार गावचेच. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या वर्गाला ते गणित शिकवत असत. केंजळे सर हे आमच्या शाळेतील कार्यक्षम आणि सक्रिय असे शिक्षक होते ज्याला आपण ‘हाडाचे शिक्षक’ असे म्हणतो. इयत्ता ४ थी तून किती आणि कोणकोणते विद्यार्थी ५ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत यावर त्याचं खूप बारकाईने लक्ष असायचं. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते अशा मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांनी स्वतःच्या पाल्याला ५ वी ला कस आपल्या शाळेत पाठवतील, यासाठी ते विशेष प्रयत्न करत. एक शिक्षक म्हणून ते गणित हा विषय फार आवडीने, सोपा करून शिकवत असत. त्यामुळेच मला गणिताची कधी भीती वाटली नाही. केंजळे सरांचा अभ्यासक्रम नेहमी परीक्षेच्या किमान २ आठवड्यापूर्वी शिकवून व्हायचा आणि त्यानंतर सुरु व्हायचं अतिशय भयानक असं उजळणी सत्र. या २ आठवडे उजळणी सत्रामधे आमच्या खेळण्यावर बंदी असायची. मुलगा खेळताना दिसला तर मुलीने नाव सांगायचं आणि मुलगी खेळताना दिसली की मुलांनी नाव सांगायचं, असा सरांचा नियम असायचा. त्यात भर म्हणजे सर शेजारच्या गावचे असल्यामुळे रोज फेरफटका मारायचे गावातून. आम्ही सगळेच खूप भीत होतो सरांना. पण सरांचं शिकवण आणि उजळणी सत्र याच फलित म्हणजे मला नेहमी गणितात पैकीच्या पैकी गुण पडायचे,मग ती घटक चाचणी असो किंवा सत्र परीक्षा असो. त्यांच्या प्रत्येक वर्गामध्ये ज्यांना गणितात पैकीच्या पैकी गुण मिळायचे त्या सर्वांना सर बक्षीस म्हणून काहीतरी भेटवस्तू द्यायचे.सरांच जस शिकवण्यात प्राविण्य होतं तसंच ते खेळात सुद्धा तरबेज होते. आमच्यासोबत ते खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट खेळताना स्वतः सहभाग घ्यायचे. तसेच आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करणे आणि सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन करणे,यामध्येही ते नेहमी पुढे असत.याव्यतिरिक्त सरांचं वैशिष्टय म्हणजे सर नेहमीच आर्थिक अडचणीत असलेल्या विदयार्थ्यांना मदत करत असत.त्यांच्या या सवयीमुळे तर त्यांचा अतिशय आदर वाटायचा.ते स्थानिक असल्यामुळे शाळेचं स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन वेळेस ध्वजारोहण कोणाकडून करायचं,यामध्येही सरांचं मत नेहमीच निर्णायक असायचं. माझासोबतच सरांचं नातं सांगायचं झालं तर माझासाठी ते एक उत्तम मार्गदर्शक होते आणि आजही आहेत. ‘नोकरी करणार असशील तर class l कर’,अस ते नेहमी मला सांगायचे. कधी आजारी पडलो तर घरी भेटायला यायचे. आजही माझी आणि सरांची जेव्हा गाठ पडते तेव्हा ते कितीही घाई असली तरी आवर्जून ५ मिनिटं का होईना बोलतात. बरं वाटतं,आपुलकी वाटते.

आज जेव्हा मला योगेशचा फोन आला तेव्हा तो मला म्हणाला की, ‘माझा आठवणीतील शिक्षक या विषयावर एक लेख लिहून पाठव’. तेव्हा चटकन माझा मनात केंजळे सरांचा विचार आला आणि मला जे जे वाटलं ते मी लिहिलं. अजून लिहायचं होत पण शब्दमर्यादा आहे.

अक्षय – ९६६५१६२०२३


मला भावलेले शिक्षक – संध्या जाधव

आपल्या आयुष्यात शिक्षणाची सुरुवात होत असताना शिक्षक ही व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या त्या लहानग्या विश्वाची जणू रोल मॉडेलच, कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे पाहत शिकत असतो. मग ते लहानपणी अंगणवाडीत घरापासून थोडं दूर राहून शाळेत मन रमवणाऱ्या बाई, अक्षर वळणदार यावं यासाठी शुद्धलेखनाचे गृहपाठ करवून घेणारे गुरुजी, बोर्डाच्या परीक्षेत यश मिळावं म्हणून जादा तास घेऊन शिकवणी देणारे सर हे सगळेच माझ्यासाठी महत्वाचे. पण मला जे शिक्षक मनापासून भावले ते ह्या सगळ्यानंतर भेटलेले कुमार मंडपे सर.

सातारा मध्ये ग्रॅज्युशन करताना नकळतपणे विवेकवाहिनी आणि नंतर अंनिसशी जोडले गेले. आपल्याला अपेक्षित असणारं काम करण्यासाठी हा योग्य विचारमंच आहे हे ज्यावेळी आतून पटलं तेव्हा याच्या साप्ताहिक बैठकांत आणि कृतिकार्यक्रमात हिरिरीने भाग घ्यायला लागलो. इथेच भेटले मला कुमार मंडपे सर, रयत शिक्षण संस्थेमधून मुख्यध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेले आणि नंतर निवृत्त झालेले.
वैचारिक भूमिका पक्की होण्यासाठी साप्ताहिक बैठकीचे स्वरूप वाचन, चिंतन, विचार समजावून घेणे आणि ते व्यक्त करण अस असायच. यामध्ये आम्हाला मंडपे सरांकडून योग्य मार्गदर्शन मिळायचं. शांतपणे विचार मांडणं, अनुभवाचे किस्से गोष्टीप्रमाणे सांगणं, चमत्कार शिकवणं आणि प्रबोधनाची गाणी यामध्ये सरांचा उत्साह कमालीचा असायचा. आपण जे बोलतो तसाच आचरणात आणण्यासाठी कदाचित वेळ लागतो, मग ते व्यक्त करायचं की प्रत्यक्ष आचरणात आणेपर्यंत शांत बसायचं अशा संभ्रमात असणाऱ्या मला त्यांची ‘तू बोलगी, मूह खोलगी, तबही जमाना बदलेगा‘ हि दिलेली शिकवण दिशादर्शकच ठरली. एखाद्या गोष्टीबाबत नव्या कार्यकर्त्यांना बोलतं करण आणि सहभागी करून घेणं सरांना छान जमायचं. एखादा विचार आचरणात आणण्याअगोदर त्याचा उच्चार आणि प्रचार करण किती महत्वाचं आहे हे आम्हाला जाणवायला लागलं. बैठक संपल्यानंतर आजच्या अभ्यासक्रमात कार्यक्रमात झालेले बदल सर जाणीवपूर्वक विचारायचे, आमच्या वेळी हे असं असायचं हे आवर्जून सांगायचे त्यामुळं त्याच्याशी गप्पा मारताना मला मजा यायची.
संविधानात सांगितलेलं कर्तव्य आणि शाळेमध्ये शिकलेल महत्वाचं मूल्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, हे शाळेतील मुलांमध्ये जोपासण्यासाठी अंनिसचा एक कार्यक्रम आहे, एक पुस्तक मुलांना द्यायचं त्यामध्ये गोष्टी आणि त्यातून आपण काय शिकलो अशा स्वरूपाचं, ह्यातील गोष्टी अगोदर मुलांना शिकवायच्या आणि त्यावर एक परीक्षा घ्यायची असा कार्यक्रम असायचा. हे पुस्तक मंडपे सर आणि मंडपे मॅडम यांनी लिहिलेलं. या कार्यक्रमकरिता सरांबरोबर जाण्याचा योग आला, लहान मुलांना गोष्टीतून मूल्य सांगण्याचं सरांचं कौशल्य भारीच होत.
असाच सरांच्या घरी एक दोनदा जाणं झालं त्यावेळी त्यांचे विचार त्याच्या घरातील गोष्टीमध्ये पण दिसून आले, विचार जगणारे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवनारे हे शिक्षक आणि निवृत्ती नंतरही हे काम मनापासून करणारे एक कार्यकर्ते मला नेहमीच भावले.

संध्या महात्मा जाधव – ७७५६८६६३९४

शिक्षक दिनाच्या तुम्हाला व तुम्हाला घडवलेल्या गुरुजनांना खूप साऱ्या शुभेच्छा.

Leave a Comment