शिक्षकदिन विशेष | गौरी नारायण मोरे, छकुताई देठे
‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम – छम छम छम’ याप्रकारे आम्ही आमच्या शिक्षकांच्या छड्या घेत तर कधी चुकवत १० वी पर्यंतच शिक्षण गावातच पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे आम्ही आमचा शैक्षणिक मोर्चा साताऱ्याकडे वळवला. अगदी शेजारच्या काकूंकडे जायचं म्हटलं तरी सोबत लागणारी आई तिकडे नव्हती, की बसायच्या बाकावर मधून रेघ मारून दोन हिस्से पाडणारी मैत्रीण तिकडे नव्हती. नवीन ठिकाणी मला अगदी गहिवरुन आल्यासारखं होई. कदाचित ग्रामीण भागामध्ये वाढलेल्या मुलीला साताऱ्याची जीवनशैली रुचली नसावी. ११ वी व १२ वीची दोन वर्षे कशीतरी काढली आणि पदवीसाठी साताऱ्यातील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला प्रवेश घेतला.
पूर्वीच्या कॉलेजमध्ये मी १०० च्या पटीमध्ये विद्यार्थी पहायचे, पण इथं मात्र डोळे आणखीच झूम करुन हजारच्या पटीत विद्यार्थी पहायला मिळाले. एखाद्या जत्रेत फिरल्यासारखं वाटायचं त्यावेळी. वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक यायचे अन जायचे, तासाला बसून खूप कंटाळा आल्यामुळे अशीच एकदा बाहेर गेले तेव्हा दोन मुली ओरडतच म्हणाल्या – वर्गात ये गौरी, सर आलेत. धावतपळतच वर्ग गाठला आणि पटकन जागा पकडली. सरांचं निरीक्षण करण्यातच २-३ मिनिटं गेली. उंच बांधा, गोरा वर्ण, धडधाकट देह, राकट चेहरा अशी पन्नाशीतील व्यक्ती माझ्यासमोर उभी होती. त्यांनी सर्वांना बसायला सांगितलं आणि स्वतःची ओळख करुन दिली. “मी हसबे सर, तुम्हाला mathematics शिकवणार आहे.” “एक लक्षात घ्या मुलांनो, गणिताचा विद्यार्थी कधी उपाशी राहत नाही, काही न काही तो करत असतोच” ही सरांची त्यावेळची वाक्य आजही आठवतात. कदाचित याच वाक्यांनी मी पुढे गणित विषय ठेवण्याचा निर्णय घेतला असावा.
“तासाला पाणी प्यायचं नाही, मी शिकवत असताना मला तहान लागत नाही, मग तुम्हाला लगेच कशी फाशी लागतेय?” या दहशतीमुळे त्यांच्या तासाला पाणी पिणं कधी जमलंच नाही. ‘नवीन मुद्दा नवीन पानावर सुरु करण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे नीटनेटकेपणाची सवय मला लागली’. या शिस्तीमुळे एक-दोनदा त्यांचा ओरडासुद्धा मी खाल्ला होता. गणितीय आकडेमोडीसोबत आयुष्याचं गणित शिकवायलाही ते कमी पडले नाहीत. त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीला आज जवळपास ६ वर्ष पूर्ण होतील. या ६ वर्षांत फक्त कॅलेंडरच्या तारखा बदलल्या. सर अजूनही तसेच आहेत – साधे आणि संयमी. आपल्या कर्तव्यात ते जराही कसूर ठेवत नाहीत. त्यांची शिकवण्यावरील निष्ठा खूपच प्रेरणादायी आहे. पन्नाशी उलटूनसुद्धा व्यायामासाठी ते अजिंक्यतारा किल्ल्यावर नियमितपणे जातात. पंचविशीतील तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. शिकवण्यासोबत शिकण्याचीही आवड असणाऱ्या हसबे सरांनी मागील वर्षीच आपली पीएचडी सुद्धा जिद्दीने पूर्ण केली. आधी विद्यार्थिनी असताना आणि नंतरच त्यांची सहयोगी शिक्षिका असताना पावलोपावली माझ्या ज्ञानाच्या कशा विस्तारतच चालल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडताना, आयुष्यात उभे राहताना मी पाहत आहे. अशा या सदाबहार शिक्षकाला यंदाच्या शिक्षकदिनानिमित्त खूप साऱ्या सदिच्छा.
गौरी मोरे – 9112621363
शिक्षकरुपी वडील – अवताडे सर
शिक्षकदिन म्हटले की अगदी अंगणवाडीपासून आठवण यायला सुरुवात होते….अगदी शिक्षकदिनाला केलेली भाषण असोत किवा शिक्षकांसाठी नकळत कार्यकम घेऊन अचानक केलेले सत्कार असो….अन दहावी मध्ये असताना इतर वर्गात घेतलेला तास असो ….एक दिवस असा असतो हा की त्या दिवशी सर्वच शिक्षकांची खूप आठवण येते…अन मग त्यांना अचानक कॉल कधी केला जातो ते पण समजत नाही…..विशेषतः शाळेतील शिक्षकाना जेव्हा वेल सेटल्ड झालेले विद्यार्थी संपर्क करतात तेव्हा त्यांच्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट ठरते….शिक्षकांबद्दल जेव्हा मी विचार करायला लागते तेव्हा मला पहिल्यांदा अंगणवाडीच्या कोळी मैडम आठवतात…. त्यांच्याकडेच मी आयुष्याचे धड़े गिरवायला शिकले….अगदी मनापासून त्या आम्हा लहान विद्यार्थ्यांची काळजी घ्यायच्या……..अंगणवाडीत मी देऊळात (त्यावेळचा वर्ग) बसायची नाही….. त्यासाठीसुद्धा मी खूप वेळ घेतला होता पण त्या कधी चिडल्या नाहीत….
प्राथमिक शाळेत मला एक वर्ष फोके गुरूजी होते….त्यांनी मराठीतील मुळाक्षरे काढायला सांगितली की मी A,B,C,D काढायची पहिल्यांदा ते रागवले पण नंतर मला समजावून सांगितले….. त्यांनीच मला लिहायला वाचायला शिकवले….. त्यांनंतर दुसरीपासून मला मासाळ उर्फ़ ढेरे मैडम शिकावायला आल्या….. त्या खूप मन लावून शिकवायच्या ….आम्हाला प्रेरित करायच्या…..सर्वांच्या पालकांशी सुद्धा त्यांचा व्यवस्थित संवाद होता….. शाळेत तर शिकवायच्याच पण घरीसुधा सकाळी लवकर बोलावून शिकवायच्या…. आजच्या काळात शाळेत शिकवून बाहेर शिकवणीकरता भरमसाठ फी आकारणाऱ्या अन शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या शिक्षकांची तुलनेत मैडम ना देवमाणूसच म्हणायला हवे…. त्या कधीच विद्यार्थ्यांना कोणतीही मदत करायला मागेपुढे पाहत नसत…..मला वाचन, भाषण करण्याचे सवय त्यांनीच लावली…. कधीही आईची कमी भासूु दिली नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्यांच्याबाबतीत…. असे निस्वार्थीपणे प्रेम करणारे अन शिकवणारे शिक्षक भेटल्यामुळेच मी पुढे वाटचाल करू शकली…..ह्या मैडम मला कॉलेज ला असताना सातारा मध्ये भेटल्या….. तर अगदी आनंदुन गेल्या आणि सोबतच त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण ही दिले….
माझी माध्यमिक शाळा तर माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरली आहे ती म्हणजे तिथल्या शिक्षकांमुळे….. मला जो काही मिळवता आले त्याचे श्रेय माझ्या या शिक्षकाना जाते….माझी माध्यमिक शाळा तर माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरली आहे ती म्हणजे तिथल्या शिक्षकांमुळे….. मला जो काही मिळवता आले त्याचे श्रेय माझ्या या शिक्षकन जाते….आमच्या शाळेतील सगळेच शिक्षक अगदी मनापासून शिकवायचे ….केवळ वर्गातील अभ्यास करायलाच नव्हे तर अवांतर वाचन, दररोज पेपर वाचन ,खेळ, या सगळ्याच बाबतीत सतत प्रोत्साहन द्यायचे…. त्यामुळे आम्ही घडत गेलो…..मला परीक्षा फी वगैरे भरायला खूप उशिर व्हायचा…. पण कधीच रागवले नाहीत….कधी कधी शिक्षकानीच माझी फी भरलीय….परीक्षा,स्पर्धा यासाठी बाहेरगावी जाण्याचा खर्चसुद्धा न सांगता केलाय….मला शाळेत असताना जामदार मैडम होत्या त्या म्हणजे जणू माझी मैत्रीणच….अजूनही आमची मैत्री कायम आहे….अगदी हक्काने घरी बोलावत्तात….. तसेच पाचवीमध्ये माझे वर्गशिक्षक होते पावले सर…. मी तशी लाजाळु होते एखाद्या स्पर्धेत भाग घेणे, पुढे येऊन बोलणे याबाबत खूप न्यूनगंड होता….परंतु त्यांच्या बोलण्याने मी खूप एक्टिव बनले….तसेच साळवी सर,शेंबडे सर यांचाही माझ्या वैचारिक जड़णघडणीत खूप वाटा आहे….त्यांनी वेळोवेळी मला अवांत्तर पुस्तके उपलब्ध करून दिली त्यामुळे मला विचार करायला लागली…….मला शाळेतील सर्व शिक्षक अगदी स्पष्ट आठवतात किंबहुना मी त्यांना विसरुच शकत नाही…. माझे विज्ञानाचे शिक्षक R. G. आवताड़े सर, हिंदीचे चंदनशिवे सर, इंग्रजीचे केंदुले सर,P. E चे जोशी सर, चित्रकलाच गवळी सर….गणिताच्या शिक्षकांबद्दल मी सविस्तर बोलेन….गणित हा माझा खूप आवडता विषय…. त्यामुळे माझे अन गणिताच्या शिक्षकाचे नाते नेहमीच वेगळे राहिले….एक भावनिक आपलेपणा कायम जाणवत राहिला…. जगदाळे सर मला गणित शिकवायचे अगदी सहावीपासू न….त्यांच्या गणित शिकवायची हातोटीच खूप मस्त होती….सगळ्यांना सामिल करून घेऊन गणित सोडवायचे त्यामुळे 100% सर्वांचे लक्ष फळ्याकड़े असायचे….अन दूसरे गणिताचे शिक्षक म्हणजे S. T. आवताड़े सर….हे सर माझ्या आयुष्यात येणे म्हणजेच एक वेगळी घटना ठरली….ते मला नववी व दहावी मध्ये भूमिती शिकवायचे ….भूमितिचे आकार शिकवत शिकवत त्यांनी आमच्या जीवनालाही आकार दिला…. ते विद्यार्थिकेंद्री शिक्षक आहेत….विद्यार्थ्यानी शिक्षक शाळेत शिकवन्यापूर्वी स्वतः घरातून वाचून आले पाहिजे….एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यासाठी प्रयत्न तरी केले पाहिजेत असे त्यांना वाटायचे….दहावीत असताना माझी दूरस्थ गुरुकुलची सरावपरीक्षा सुरु होती….ते सलग जवळ जवळ एक महिना पेपर चालू होते…अन माझे तब्येतीकडे अजिबात लक्ष नव्हते ….एके दिवशी सर वर्गात आले बहुतेक त्यांना घरच्यानी सांगितले असावे …त्यांनी माझी विचारपुस केली अन पटकन खिशातून पैसे काढून दिले अन म्हटले पेपर सुटला की दवाखान्यात जा अजून पैसे लागले तरी सांग…. असे शिक्षक असल्यावर शाळा घर का वाटणार नाही…. मला या अशा शिक्षकांमुळे शाळा नसली की करमायचेच नाही…मला माझे शिक्षक खूप आवडतात…. अजूनही मी शिकतेय याच्या पाठीमागे त्यांची प्रेरणा आहे….दहावी नंतर सर्व शिक्षकानी ग्रामस्थांच्या सहकार्याने माझ्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलला….फक्त खर्चच नव्हे तर वेळोवेळी अजूनही विचारपुस करत असतात….S. T. आवताड़े सर यांनी तर मला मुलगी म्हणूनच स्वीकारले….. अन मला हक्काचे कुटुंब मिळाले…..मला वाटते एखाद्याच्या आयुष्यात यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती नसेल….
छकुताई देठे – 9545340169