किती ते दुर्भाग्य! नातेवाईक नसल्यामुळे जामीन मिळूनही कैद्याने तुरुंगातच काढले दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दररोज कित्येक कैद्यांना अटक केले जाते तर कितीतरी कैद्यांची सुटका होत असते. परंतु तेलंगणा येथील रामा कृष्णा मकेना या कैद्यावर सुटका होऊन देखील तुरुंगातच राहण्याची वेळ आली होती. मात्र शेवटी मुंबई विशेष न्यायालयाचे (Bombay Special Court) न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या आरोपीची तब्बल एक वर्षानंतर सुटका केली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? हा आरोपी जामीन मिळून देखील तुरुंगातच का राहिला? याविषयी जाणून घेऊया.

प्रकरण काय आहे?

रामा कृष्णा मकेना या आरोपीकडून 2022 साली सीमाशुल्क विभागाने गांजा जप्त केला होता. त्यानंतर त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंध 1985 कायद्यानुसार खटला सुरू होता. या आरोपीवर पोलिसांनी गांजाची तस्करी करण्याचा गंभीर आरोप ठेवला होता. मात्र या प्रकरणांतून एका वर्षापूर्वीच म्हणजेच 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्याची सुटका करण्यात आली. हा आरोपी मूळचा तेलंगणामधील एका छोट्या गावातून आलेला होता. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रात कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते. या कारणामुळे त्याची सुटका रखडली गेली. शेवटी याप्रकरणात लक्ष घालत न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी रामा कृष्णा मकेनाची सुटका केली.

दरम्यान, रामा कृष्णा मकेना मूळचा तेलंगणामधील रहिवाशी आहे. गांजा तस्करी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मुंबईत त्याच्याकडून गांजा जप्त केला होता. तसेच या गंभीर प्रकरणामुळे त्याला अटक करण्यात आली होती. परंतु तीन महिन्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र जामीन मिळून देखील त्याला आपल्या घरी जाता आले नाही.

सुटका करण्यासाठी कोणी नाही..

झाले असे की, रामाचे मुंबईमध्ये कोणीही ओळखीचे आणि नातेवाईक नव्हते. त्यामुळे त्याच्या जामीनाची पन्नास हजार रुपये रक्कम भरण्यासाठी कोणीही पोलीस ठाण्यात आले नाही. यात त्याचे वृद्ध आईवडील, कुटुंब तेलंगणामध्ये असल्यामुळे मुंबईत येऊन त्याची सुटका करणे कोणालाही शक्य झाले नाही. या सर्व प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले. शेवटी लीगल सर्विसच्या वतीने रामाची ही बाजू न्यायालयापुढे वकील भाग्येशा कुरणे यांनी मांडली. यानंतरच आता मुंबई सत्र न्यायलयाने रामाची सुटका केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे, “सध्याच्या घडीला अनेक कैदी जामीन मिळवून देखील विविध कारणांमुळे तुरुंगातच राहत आहेत. देशभरामध्ये अशा कैद्यांची संख्या 5000 पेक्षा जास्त आहे. सर्वोच्च न्यायालय सांगते की, जामीन मंजूर झाला की आरोपीची तात्काळ सुटका केली पाहिजे. परंतु असे असताना देखील राज्याच्या विविध तुरुंगामध्ये अनेक आरोपी जामीन मिळून देखील अडकलेले आहेत.” ही माहिती वकील भाग्येशा कुरणे यांनी दिली आहे.