हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकालच्या काळात विमा योजना ही एक गरज बनली आहे. यात कोरोनाच्या कालावधीनंतर आरोग्य विमा करून ठेवण्याबाबत लोक अधिक विचार करू लागले आहेत. यामुळेच अनावश्यक खर्च सोडून लोक विम्यात जास्त गुंतवणूक करत आहेत. परंतु या महिन्यात गुंतवणूक करताना टर्म इन्शुरन्स (Term Insurance) की लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) यातील नेमका कोणता पर्याय निवडावा यामध्ये लोकांचा गोंधळ उडतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या दोन्हीतील फरक सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकाल.
टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय?
मुदत विमा ही एक विमा पॉलिसी आहे. जी एका निश्चित कालावधीसाठी निश्चित पेमेंट दराने कव्हरेज प्रदान करते. यामध्ये पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कव्हरची रक्कम नॉमिनीला एकर कमी दिली जाते. यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. टर्म इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटी रिटर्न उपलब्ध नसतात.
तर लाइफ इन्शुरन्स पॉलिसी संपूर्ण आयुष्यासाठी कव्हरेज प्रदान करण्याचे काम करते. यामध्ये जर विमाधारक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला विमा कंपनीकडून परिपक्वता लाभ, सरेंडर बेनिफिट, लॉयल्टी ॲडिशन इत्यादी आर्थिक सहाय्य मिळते. तसेच, लाइफ इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटीनंतर प्रीमिअम रकमेवर व्याजासह एकरकमी अमाउंट दिली जाते.
सर्वात जास्त फायदेशीर काय??
खरे तर, तुम्ही कोणताही इन्शुरन्सचा पर्याय निवडावा हे तुमच्यावर अवलंबून असते. टर्म इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स पेक्षा अधिक स्वस्त असतो. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी इन्शुरन्स करायचे असेल तर टर्म इन्शुरन्स हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. टर्म इन्शुरन्स योजना तुम्हाला कमी पैशात जास्तीत जास्त परतावा देते. याच्या मदतीने तुम्ही पैसे वाचवू शकता. लक्षात ठेवा की जर एखाद्या व्यक्तीने मुदतीच्या विमा योजनेत प्रीमियम भरणे थांबवले तर त्याला फायदे मिळणे बंद होते. यासह पॉलिसी देखील बंद केली जाते
परंतु जर तुम्हाला आजीवन कव्हरेज हवे असेल तर तुम्ही लाइफ इन्शुरन्सचा विचार करावा. लक्षात ठेवा की, यात तुम्हाला अधिक पैसे गुंतवावे लागतात. तुम्ही तुमची लाइफ इन्शुरन्स योजना मध्येच थांबवली तर या पॉलिसीची संपूर्ण रक्कम मिळत नाही. तुम्हाला फक्त प्रीमियम म्हणून जमा केलेली रक्कम मिळते. त्यामुळे या दोन्ही इन्शुरन्स मधला नेमका कोणता पर्याय निवडावा?? हे सर्वस्वी तुमच्या हातात असते.