ठाकरे गटाचे आमदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार? नव्या दाव्याने राजकिय वर्तुळात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना अपात्र ठरवलेले नाही. परंतु त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे, असा देखील निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) एक मोठा दावा केला आहे.

रत्नागिरीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, “उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत” असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत म्हणाले की, “उद्धव ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. 14 तारखेपासून काय होतंय ते पाहा” त्यांनी दिलेल्या या संकेतामुळे आता राजकीय वर्तुळात काही घडामोडी घडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढे बोलताना उद्या सामंत म्हणाले की, “मिलिंद देवरा यांच्या साऱख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल”

इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीवर टीका करत, “ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. पहिले त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करावा. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 10 ते 20 टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा. हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानांचा चेहरा नाही” अशा शब्दात उदय सामंत यांनी हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे ठाकरे गटाचे नेते शिंदे गटावर आणि नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यामध्ये शिंदे गटाकडून देखील पलटवार करण्यात येत आहे. यात ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात येथील असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता हा दावा कितपत खरा ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.