मणिपूरमध्ये मरणारे हिंदू नाहीत का? सामनातून केंद्र सरकारवर टीकेचा बाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयानंतर मणिपूर मध्ये मोठा हिंसाचार घडत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा हिंसाचार सुरूच असून काल तर संतप्त आंदोलकांनी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घरावरच पेट्रोल बॉम्ब टाकून संपूर्ण घर पेटवून दिले. या सर्व घटनांवर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. मणिपूर मध्ये प्रचंड हिंसाचार घडत असताना मोदी गप्प का आहेत?? मणिपूर मध्ये मरणार हिंदू हा हिंदू नाही का? असे सवाल सामनातून करण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

मणिपूर हे राज्य हिंदुस्थानचा भाग नाही, असे केंद्रीय सरकारला वाटते आहे काय? गेल्या दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये खुलेआम कत्तली व रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत 115 हून अधिक लोक मणिपूरमध्ये पेटलेल्या जातीय वणव्यात मृत्युमुखी पडले. 400 हून अधिक लोक या हिंसाचारात जखमी झाले. जिवाच्या भीतीने हजारो नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. गुरुवारी तर हिंसक जमावाने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आरके रंजन सिंह यांचे इंफाळमधील निवासस्थानच पेटवून दिले. त्यावेळी मंत्रिमहोदय सुदैवाने घरात नव्हते आणि इतरही कोणाला दुखापत झाली नाही. तथापि, मणिपूरमधील हिंसाचाराची मजल आता केंद्रीय मंत्र्यांचे निवासस्थान जाळण्यापर्यंत गेली याचा अर्थ काय? खुद्द आरके रंजन सिंह यांनीही मणिपूरमधील हिंसक घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. तरीही केंद्रातील सरकार ढिम्मच राहणार आहे का? जातीय विद्वेषाच्या आगीत मणिपूर दररोज जळते आहे आणि देशातील ‘महाशक्ती’ सरकार मात्र हा हिंसाचार हतबलपणे पाहत आहे. असं ठाकरे गटाने म्हंटल आहे.

केंद्रीय गृहमंत्री मणिपूरच्या दौऱ्यावर गेले असता हिंसाचार व दंगलींचे सारे खापर न्यायालयावर फोडून त्यांनी हात झटकले. देशातील जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी गृहखात्याची आहे याचेही भान सरकारला राहिलेले नाही. शिवाय, ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ले सुरू आहेत, ते पाहता हा सगळा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग असावा अशी शंका सामनातून व्यक्त करण्यात आली. कुकी दहशतवादी अचानक शस्त्रास्त्रांसह कुठल्याही गावाला वेढा घालतात, जाळपोळ करतात, असॉल्ट रायफलींनी अंदाधुंद गोळीबार करतात आणि हत्याकांडे घडवून पसार होतात. कुकी अतिरेक्यांनी काही वर्षांपूर्वी नागा जमातीच्या 100 आदिवासींचेही असेच हत्याकांड घडविले होते. कुकी या रायफली व शस्त्रास्त्रे कुठून येतात, हे तरी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगावे. की त्यासाठीही गृहमंत्री न्यायालयालाच जबाबदार ठरवणार आहेत? असा टोलाही सामनातून लगावण्यात आलाय.

तब्बल 45 दिवसांपासून आपल्याच देशातील एका राज्यात खुनी हल्ले, निर्घृण हत्याकांडे व रक्ताचे पाट वाहत असताना देशाचे पंतप्रधान नेमके काय करीत आहेत, असा प्रश्न मणिपूरच्या जनतेला नक्कीच पडला असणार. पुन्हा मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे व एन. बिरेन सिंह नावाचे भाजपचे गृहस्थ तिथे मुख्यमंत्री आहेत. सरकार पक्षाच्याच भाषेत सांगायचे तर मणिपूरमध्ये ‘डबल इंजिन’चे सरकार आहे. राज्यात आणि केंद्रा दोन्हीकडे एकाच पक्षाची म्हणजे भाजपची सरकारे असतील तर सरकारी कारभार उत्तम होतो व प्रशासनही सक्षमपणे काम करते, असा दावा भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच केला जातो.हा दावा खरा मानला तर राज्य व केंद्रातही भाजपची सत्ता आहे. असताना मणिपूर का पेटले ? ‘डबल इंजिन’चे सरकार तिथे फेल का झाले व अजूनही तिथे शांतता प्रस्थापित का होऊ शकली नाही याचे उत्तर आता सरकार पक्षाच्या वाचाळवीरांनी द्यायला हवे.

हिंसाचारात जळणाऱ्या मणिपूरची जनता दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगते आहे आणि देशाचे पंतप्रधान या गंभीर संकटाविषयी चकार शब्दही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांच्या हल्ल्यात हिंदू मरत आहेत आणि नकली हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे तथाकथित महाशक्तीचे सरकार डोळे मिटून हा रक्तपात पाहत आहे. देशभरात हिंदू जनआक्रोश मोर्चे काढणाऱ्या सरकार पक्षाला मणिपुरातील हिंदूंचा नरसंहार दिसत नाही काय? मणिपूरचा हिंदू ‘हिंदू’ नाही काय? असा संतप्त सवाल करत शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.