हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील राड्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या निमित्ताने अचानक अशी दंगल का उसळावी? हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे ? असा सवाल करत रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
श्रीरामनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दंगलीच्या ठिणग्या पडल्या. हे काही बरे घडले नाही. मर्यादापुरुषोत्तम, संयमी, एकवचनी, सत्यवचनी म्हणून श्रीरामाची कीर्ती आहे. त्या रामाच्या जन्मदिनी त्याचे भक्त म्हणवून घेणारे हिंसा करतात. इतरांच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक करतात, हे चित्र जगातल्या चौथ्या की पाचव्या आर्थिक महासत्तेस शोभा देणारे नाही. उलट देशाची ‘शोभा’ करणारेच हे प्रकार आहेत. राम हे हिंदुस्थानचे महानायक मानले जातात. त्या महानायकाचा जन्मदिवस दंगलीसाठी ओळखला जावा हे त्या महानायकाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
रामनवमीच्या पूर्वसंध्येस व त्याच दिवशी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबईतील मालवणी येथे दंगली झाल्या. गुजरातमधील वडोदरा येथे दोन धार्मिक गटांत दगडफेक झाली. प. बंगालातील हावडा येथेही रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दंगल घडविण्यात आली. हे सर्व हिंदू- मुसलमानांत झाले व भाजपास हवे तेच झाले. छत्रपती संभाजीनगरात शहराच्या नामांतराची सूचना निघाल्यापासूनच पेटवापेटवीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दंगलीमागच्या डोक्यांनी मुहूर्त साधला तो रामनवमीचा असं सामनातून म्हंटल आहे. राममंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, पण हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले ? असा सवाल सामनातून करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, भिवंडी ही दंगलींची शहरे म्हणून एकेकाळी ओळखली जात होती, पण गेल्या काही वर्षांत हे चित्र साफ बदलले आहे. अर्थात दंगली नसल्या की, अनेकांच्या रोजीरोटीची सोय होत नाही. त्यामुळे अशा दंगलबाज टोळयांना हवा देऊन राजकारणी मंडळी शहरे व गावे जाळत असतात. महाराष्ट्रात तेच घडताना दिसत आहे. डॉ. मिंधे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत अधोगतीस जात आहे. लोकांचा त्यांना भोपळय़ाइतकाही पाठिंबा नाही. त्यामुळे दंगलींचा आधार घेऊन ते स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानून घेत आहेत. हा महाराष्ट्र धर्माचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. हे असे करून कोणी राजकीय भाकऱ्या शेकत असेल तर ते राज्य बुडवायला निघाले आहेत असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.
गुजरात व महाराष्ट्रात भाजपचे राज्य आहे. तरीही अशा दंगली होत आहेत. अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्व काही शांततेत सुरु असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱया अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.