हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीनंतर आत्मपरीक्षणाच्या कालखंडातून गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता नव्या आत्मविश्वासासह पुन्हा मैदानात उतरायचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (16 एप्रिल ) नाशिकमध्ये मुंबईबाहेरील पहिलं कार्यकर्ता शिबिर होत आहे. “मी शिवसेनेतच का?” या विषयावर केंद्रित असलेल्या या शिबिराकडे राज्याच्या राजकारणात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. तर या शिबीर घेण्यामागचा उद्देश काय ? अन शिवसेनेची येत्या काळात रणनीती कशी असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे शिबिर अत्यंत निर्णायक मानले जाणार –
शिवसेना ठाकरे गटासाठी हे शिबिर अत्यंत निर्णायक मानले जात असून, गटात सुरू असलेल्या गळतीला रोखणे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, अन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना बळकट करणे, हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून, समारोपाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच शिबिरात कार्यकर्त्यांना आपली मते, अडचणी मांडण्याची संधी दिली जाणार आहे. याच पॅटर्ननुसार संपूर्ण राज्यभर शिबिरांचे आयोजन होणार असून, पक्षप्रमुख ठराविक वेळेत राज्यभर दौरेही करणार आहेत.
मुंबई महापालिका जिंकण्याच्या रणनीतीवर –
या शिबिरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये विशेषतः मुंबई महापालिका जिंकण्याच्या रणनीतीवर भर दिला जाणार आहे. एकूणच, ठाकरे गटाने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली असून, या शिबिराच्या माध्यमातून पक्षात नवचैतन्य निर्माण करणे हा प्रमुख हेतू आहे. यामुळे आगामी महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठे परिवर्तन पाहायला मिळू शकते.