हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी योग्य वेळ ओळखून राजकारणात प्रवेश केल्याचं आपण बघितलं आहे. आत्तापर्यंत एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) ,जयललिता आणि रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी रुपेरी पडद्यावरून थेट राजकारणात एंट्री मारली. आता यामध्ये स्टार अभिनेता विजय थलापती (Thalapathy Vijay) याचेही नाव जोडलं गेलं आहे. विजय थलापती हा सुद्धा सक्रिय राजकारणात उतरला असून आज त्याने पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केलं आहे.
चेन्नईच्या पायनूर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात पक्षाचा ध्वज आणि प्रतीक अधिकृतपणे लॉन्च केले. यावेळी तामिळनाडूच्या विकासासाठी एकत्र काम करण्यावर विजय थलापती यांनी भर दिला. विजय थलापतीच्या पक्षाचे नाव ‘तमिझागा वेत्री कषगम’ असे आहे. त्याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पार्टी’ असा होतो. तामिळनाडू मध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी विजय थलापती यांचा तमिझागा वेत्री कषगम’ पक्ष सज्ज झाला आहे. खरं तर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात आपल्या पक्षाची घोषणा केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी कोणताही सहभाग घेतला नव्हता आणि जाहीर केले नव्हते.
आज झेंड्याचे अनावरण करण्यापूर्वी विजय थलापती यांनी प्रतिज्ञा वाचून दाखवली. त्यात त्याने म्हंटल, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लढवय्यांचे आणि तामिळ मातीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढलेल्या असंख्य सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू. मी जात, धर्म, लिंग आणि जन्मस्थानाच्या नावावरील भेदभाव दूर करीन. लोकांमध्ये जागृती निर्माण करून सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळावेत यासाठी प्रयत्नशील राहीन. मी प्रतिज्ञा करतो की मी समानतेचे तत्त्व कायम ठेवीन असं विजय थलापती यांनी म्हंटल.