ठाण्याचा खासदार असली की नकली शिवसेनेचा?

thane lok sabha fight between 2 shivsena
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना फोडून शिंदेंनी मुंबईला हादरे दिले. ठाण्याच्या वाघाने शिवसेनेचं सत्ता केंद्र मातोश्रीहून ठाण्याकडे शिफ्ट केलं. पण शिवसेना हा पक्ष आणि ठाणे हा बालेकिल्ला आपलाच असल्याचं ठासून सांगायचं असेल तर शिंदेंसाठी ठाण्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने या जागेसाठी (Thane Lok Sabha 2024) हट्ट धरला होता. पण शेवटी तोंड बुक्यांचा मार सहन करत ठाण्याची जागा शिंदेंनी आपल्या पदरात पाडून घेतलीच…एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि ठाकरेंकडून स्टॅंडिंग खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात आता ठाण्यासाठी लढत होणार आहे. आनंद दिघे यांच्या तालमीत वाढलेले हे दोन्ही कार्यकर्ते आता एकमेकांच्या विरोधात खासदारकीसाठी लढणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातच आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणारय. खऱ्या अर्थानं नकली शिवसेना आणि असली शिवसेना याचा फैसलाच ठाण्यातून लागणार असल्यानं ठाण्याचा खासदार कोण? शिवसैनिक ठाण्याचा बालेकिल्ला कुठल्या शिलेदाराला देणार? शिंदे की ठाकरे? याचाच घेतलेला हा माहितीपूर्ण आढावा…

लोकसभेची लढाई म्हणजे कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार अशी असणार आहे. ही लढाई एकतर्फी होणार आहे. उशिरा उमेदवारी जाहीर करणे हा आमच्या रणनीतीचा भाग होता, महायुतीकडून ठाण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के यांचा हा कॉन्फिडन्स…कुणी कितीबी आपटा जिंकणार तर आपणच. ही लाईन तिकीट जाहीर होण्याच्या पहिल्याच दिवशी रिपीट करत ठाण्यात लढत अटीतटीची होणार, याची चुणूक दाखवून दिलीये. ठाकरे गटाकडून ठाण्याची उमेदवारी बंडाळीत आपल्यासोबत एकनिष्ठ राहिलेले आणि सलग दोन टर्मचे खासदार राजन विचारे यांनाच कायम ठेवण्यात आली. पण दुसऱ्या बाजूला महायुतीचा उमेदवार बऱ्याच चर्चा होऊनही काही ठरत नव्हता.. ठाण्याचं नाक दाबून मुंबईच्या इतर जागा शिंदेंनी आपल्या पदरात पाडून घेतल्या. भाजपसाठी ठाण्याचा बळी दिला.अशा चर्चा कालपर्यंत रंगल्या होत्या. यामागचं कारण म्हणजे भाजपने काहीही करून या जागेवरून लढण्याचा केलेला निर्धार…पण चर्चेच्या टेबलावर शिंदेंनी भाजपवर मात केली. आणि ठाण्याची जागा आपल्याकडे खेचून आणली… प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असताना शिंदेंनी त्यांचा हुकमी एक्का म्हणजेच नरेश म्हस्के यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलय…

नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंना पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला होता. शिवसेनेतून सर्वात पहिली हकालपट्टी ही नरेश म्हस्केंची करण्यात आली होती. आता याच त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना शिंदेंनी दिलंय. आपल्याच बालेकिल्ल्यातून खासदारकीसाठी म्हस्केंवर शिंदेंनी विश्वास टाकलाय…नरेश म्हस्के यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 साली नरेश म्हस्के पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2017 साली ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. 2017 साली त्यांची महानगरपालिकेमध्ये सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली. यावेळेस ठाण्यामध्ये शिवसेनेचं काम तत्कालीन मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच काम केलं जात होतं.

2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौर निवडणुकीमध्ये उमेदवारच जाहीर केला नाही. त्यामुळे नरेश म्हस्के बिनविरोध महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पुढे तीन वर्ष महापौर राहिले. नरेश म्हस्केंनंतर मिनाक्षी शिंदे महापौरपदी नियुक्त झाल्या. सध्या हे दोघेही शिंदे गटामध्ये आहेत. मिनाक्षी शिंदे या शिंदे गटाच्या महिला आघाडीचं नेतृत्व करतात. शिंदेनी शिवसेनेचे जे बंड केलं होतं त्याला पहिली खमकी साथ नरेश म्हस्के यांचीच होती. म्हस्केंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमधील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. शिंदेंच्या ठाण्यातील राजकारणाचा विचार केल्यास नरेश म्हस्के त्यांचा उजवा हात आहेत. शिंदेंचे सध्याच्या घडीला ठाण्यातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून नरेश म्हस्केंकडे पाहिलं जातं. हाच सगळा राजकीय इतिहास पाहता त्यांना ठाण्यातून उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय हा किती समर्पक आहे, याची जाणीव होते…

ठाण्यातील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण फुटले… त्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली… पण अशा परिस्थितीतही एकच सच्चा कडवा शिवसैनिक हा ठाकरेंशी एकनिष्ठ राहिला. ते म्हणजे ठाण्याचे खासदार राजन विचारे. सगळी फळी विरोधी पार्टीत असतानाही विचारे ठाण्यात एकट्याने खिंड लढवतायत… ठाकरेंना बळ देतायत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा त्यांना खासदारकीचं तिकीट रिपीट झालं. थोडक्यात काय ठाण्यात राजन विचारे वर्सेस नरेश म्हस्के अशा दोन कडवट शिवसैनिकांमध्ये खासदारकीसाठी लढत पाहायला मिळणारय. असली शिवसेना कुठली? आणि नकली शिवसेना कुठली? याचा निकालही ठाण्याच्या निवडणुकीत कडवट शिवसैनिक दाखवून देणार आहेत. या सगळ्याचे विचार करतात ठाण्याची प्रतिष्ठेची तर आहेच पण सोबतच स्वाभिमानाची देखील आहे. अनेक वर्ष बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना फुटीनंतर मतपेटीच्या माध्यमातून कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार? राजन विचारे की नरेश म्हस्के? दोन्ही पक्षांपैकी असली आणि नकली शिवसेना तुम्हाला कुठली वाटते? तुमची मतं, प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.