औरंगाबाद | चार दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या दिव्यांग बालकाला घाटी परिसरात सोडून नातेवाईकांनी पळ काढल्याची घटना समोर आली होती. या चार दिवसात घाटीतील डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी या दिव्यांग बालकांचा सांभाळ केला. आणि मंगळवारी या बालकाला भारतीय समाजसेवा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले. आणि या बालकाचे ‘साहिल’ असे नामकरण करण्यात आले आहे.
घाटीत 4 दिवस दाखल असताना बालकाविषयी विचारणा करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शनिवारी दि. 3 रोजी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. चौकशी केल्यानंतर बालकाचा एकही नातेवाईक पुढे आला नाही. या बालकाला घाटीच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली होती. याप्रकरणी घाटीचे सरफराज आणि सुरक्षारक्षक यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तृप्ती जोशी, डॉ. उबेद रहमान, डॉ. प्रियंका घोंगडे, डॉ. अंजुम अशोकन, डॉ. उमेश नेतंम, डॉ. निखिल रेड्डी, डॉ. पायल निकोसे, ब्रदर विशाल ब्रदर यांच्यासह परिचारिकांनी साहिलची काळजी घेतली.
या प्रकरणी माहिती मिळताच उपनिरीक्षक ज्योती गात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घाटीत धाव घेतली होती. आणि रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु होते. चार दिवसांमध्ये या बालकाचे नातेवाईक समोर आले नसल्यामुळे बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती गात, पोलीस काॅन्स्टेबल रियाज यांच्यासोबत या बालकाला भारतीय समाज सेवा केंद्रात पाठवण्यात आले.