अखेर बेस्ट सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप घेेतला मागे; सरकारने केल्या ‘या’ सर्व मागण्या मान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट सेवेच्या कंत्राटी कामगारांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आज सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांची पगार 18,000 करण्याची मागणी मान्य केली आहे. तसेच, कामगारांच्या वार्षिक रजा भरपगारी करण्यात येईल ही त्यांना प्रवास मोफत देण्यात येईल ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कामगारांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात यावा, कामगारांना साप्ताहिक सुट्टी पगारी असावी, ही मागणी मान्य झाली आहे. आता लवकरच कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना येणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना गेल्या सात दिवसांचा पगार देखील देण्यात येणार आहे.

बेस्ट बस मुंबईकरांच्या सेवेसाठी नेहमी हजर राहिली आहे. मात्र गेल्या आठवड्यात बेस्ट सेवेच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारला होता. कामगारांनी समान काम, समान वेतन या मागणीसाठी आझाद मैदानावर हा संप पुकारला होता. या संपात कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या सरकार पुढे मांडल्या होत्या. हा संप पुकारल्यामुळे आठ दिवस मुंबईकर हैराण होते. शेवटी कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहे. या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर, सामान्य माणसाचे सरकार आहे म्हणून सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे.