औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ एआयसीईटीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 25 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या समारंभाची जय्यत तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 वा दीक्षांत समारंभ 25 जून रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांचे दीक्षांत भाषण होईल. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोशारी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती राहील, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाट कुलसचिव, डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह सर्व अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांकडून मागवले अर्ज :
विद्यापीठाकडून ऑक्टोबर /नोव्हेंबर 2019 आणि मार्च/ एप्रिल 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण व पदवीस पात्र विद्यार्थ्यांकडून दीक्षांत समारंभासाठी उपस्थित व अनुपस्थित पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज 10 जून पर्यंत ऑनलाईन भरून विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंशता अथवा टपालाने प्राप्त होतील या बेताने सादर करावीत. यामध्ये पदवी व पदविका अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर चे अभ्यासक्रम, पीएच. डी. प्रमाणपत्र तसेच जे स्नातक पदवीस प्राप्त आहेत व ज्यांनी परीक्षा आवेदनपत्रासोबत पदवी आवेदनपत्र सादर केलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आवेदन दाखल करण्याची आवश्यकता नाही असे आवाहन डॉक्टर योगेश पाटील यांनी केले आहे.