हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करमाळा तालुक्यातील साडे येथील युवा शेतकरी महादेव मोरे यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करून एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे अनेक राज्यातून अन अमेरिकेतून मोठी मागणी निर्माण झाली आहे. या मागणीमुळेच त्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. तर चला या भन्नाट प्रयोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शेवग्याच्या पाल्याची पावडर –
मोरे यांनी सुरुवातीला एक एकर शेवग्याची शेती केली होती, पण कोरोनामुळे त्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. त्यानंतर, त्यांनी शेवग्याच्या पाल्याची पावडर करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. परंपरागत शेवग्याच्या शेंगांची विक्री करण्याऐवजी, शेवग्याच्या पाल्याची पावडर तयार केली आणि ती हवाबंद ड्रममध्ये भरून विविध राज्यात आणि अमेरिकेला निर्यात करण्याची योजना आखली. यासाठी मोरे यांनी साडेसात एकरावर शेवग्याची शेती केली आहे. तसेच त्यांना युट्यूबवरील गुजरातमधील शेवग्याची शेतीवर आधारित माहितीने प्रेरित केले.
विविध ठिकाणाहून मोठी मागणी –
रासायनिक खतांचा वापर न करता, मोरे यांनी गांडूळ खत आणि शेणखतांचा वापर करून शेवग्याच्या पाल्याच्या उत्पादनात उत्कृष्ट गुणवत्ता राखली आहे. या शेतीसाठी सुमारे 70,000 रुपये खर्च असून , त्यातून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शेवग्याच्या पाल्याची पावडर कोलकत्ता, हैदराबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे येथे विकली जात आहे. तसेच अमेरिकेतूनही याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. सुरुवातीला त्यांना एकरी 4 ते 5 टन पावडर उत्पादन मिळाले आहे. महादेव मोरे यांच्या अभिनव प्रयोगाने इतर शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ठरला आहे आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे शेवग्याच्या पाल्याच्या पावडरच्या निर्यातीत वाढ झाली आहे.




