औरंगाबाद | कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम प्रत्येक केंद्रावर अतिशय बारकाईने राबविण्यात यावी असे आदेश राज्य व केंद्र सरकारने दिले आहेत. असे असतानाही आरोग्य यंत्रणेकडून निष्काळजीपणा सुरूच आहे. शहरातील छावणी परिषदेच्या रूग्णालयात बुधवारी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या महिलेला दुसरा डोस चक्क कोविशिल्डचा देण्यात आला. शिवाय घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला देखरेखीत ठेवण्याऐवजी थेट घरी पाठवून देत जबाबदारी झटकली.
अगोदरच कोरोना महामारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णावर योग्य उपचार होणे आवश्यक असताना अनेक वेळा निष्काळजीपणा होत आहे. काही ठिकाणी डॉक्टर पूर्णपणे नर्सिंगच्या कर्मचार्यावर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे किमान लसीकरण मोहीम काळजीपूर्वक व्हावी यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक केले आहे. तसेच चुकीचे लसीकरण होऊ नये यासाठी लसीकरणा पूर्वी नागरिकांचे कोविन ॲपवर नोंदणी करणे देखील सक्तीचे केले आहे.
या नोंदणीमुळे व्यक्तीने पहिला डोस कोणत्या वॅक्सिनचा घेतला. याची संपूर्ण माहिती ॲप वर त्या व्यक्तीचे नाव टाकतात समोर येते. त्यामुळे लस घेणाऱ्याला पहिला डोस कोणत्या वॅक्सिनचा घेतला याचा विसर पडला तरी आरोग्य विभागाला त्याबाबत माहिती मिळते. एवढी सुविधा असतानाही बुधवारी परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घाईघाईत एका वृद्ध महिलेला पहिला डोस कोवॅक्सिनचा दिला असताना दुसरा डोस कोविशिल्डचा दिला.
ॲप वर त्या वृद्ध महिलेचे नाव टाकण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसऱ्या परिचारिकेने लस टोचून दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याने जबाबदारी झटकत डॉक्टर आणि इतर कर्मचार्यांनी तातडीने त्या वृद्ध महिलेसह त्यांच्या मुलाला रुग्णालयातून बाहेर काढले.
आईला पहिला डोस कोवॅक्सिनचा दिलेला असताना दुसरा डोस कोविशिल्डचा कसा दिला. असा जाब त्या वृद्ध महिलेच्या मुलाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विचारला असता तेव्हा इतर कर्मचाऱ्यांनी त्यास वाद घालून नको, पोलिसांना सांगून माळ देऊ, अशी धमकी देऊन हुसकावून लावले.
महिलेला रिअक्शन नाही….
छावणी परिषदेच्या रुग्णालयात सध्या कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. सकाळी देखील प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गडबडीत वृद्ध महिलेला पहिला डोस कोणत्या व्यक्तींचा दिला याची माहिती तपासण्या पूर्वीच लस दिली गेली. यामुळे महिलेला कुठलेतरी रिअक्शन झालेला नाही. तसेच दोन्ही डोस अँटीजन असून पहिला डोस हा बॉडी अँटीजनआहे. तर दुसरा डोस हा स्पाईक अँटीजन आहे. त्यामुळे या महिलेला आता दुसरा डोस देण्याची आवश्यकता नाही.
– विनोद धामंदे, एआरएमओ, छावणी रुग्णालय