औरंगाबाद | औरंगाबादमध्ये पहिल्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी शहरात आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठपुरावा केला होता. मराठवाड्यात आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती.
या आरोग्य सुविधासाठी मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना शस्त्रक्रिया, गंभीर आजारावर उपचारासाठी पुणे, नागपूर, मुंबईला जावे लागत होते. परंतु आता याप्रकरणी खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन, निती आयोगाचे अभिताभ कांत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
ज्याप्रमाणे रेल्वेचे स्वतंत्र हॉस्पिटल आणि मिल्ट्रीचे स्वतंत्र हॉस्पिटल असते तसेच केंद्रीय आरोग्य विभागाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. या हॉस्पिटलमध्ये साधारण उपचारासोबतच कोरोनाची तपासणी, उपचार, निदान करणे सोपे जाईल. त्याचबरोबर हॉस्पिटलसाठी मेडिकल ऑफिसर फार्मासिस्ट, कारकून, स्टाफ नर्स, यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आता औरंगाबाद येथे केंद्र झाल्याने त्यांना मोठा फायदा होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खैरे यांना पाठवलेल्या पत्रानुसार नाशिकसोबत देशातील 17 शहरात हॉस्पिटल होणार आहे.