Saturday, February 4, 2023

अभिमानस्पद! साताऱ्याच्या सुपुत्राने बनवलं भारतीय बनावटीचे पाहिलं विमान; सरकार देणार 12 कोटी

- Advertisement -

कराड | भारतीय बनावटीचे पहिले विमान तेही सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचे लवकरच पहायला मिळणार आहे. ढेबेवाडी विभागातील अमोल यादव यांच्या विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी 12 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या बैठकीत घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः अमोल यादव यांनी दिली आहे.

पाटण तालुक्यातील सळवे येथील कॅप्टन अमोल यादव यांचे मूळ गाव आहे. भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवून ते ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रदर्शित केल्यानंतर देशभर चर्चेत आले. कॅप्टन यादव यांचा संघर्षमय व जिद्दीचा प्रवास नव्या पिढीसाठी आदर्शवत ठरावा, असा आहे. सन 1997 पासून ते विमान तयार करण्याचा प्रयत्न करत होते. तिसऱ्या प्रयत्नानंतर 2009 मध्ये त्यात यश आले. एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसासाठी हे आर्थिक धाडस खूप मोठे होते. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यादव कुटुंबीयांनी खूप हाल सोसले. रस्त्यावर येण्यासारखी परिस्थिती आली असतानाही ते डगमगले नाहीत.

- Advertisement -

अनेकांनी मदत, प्रोत्साहन व कौतुकाचे पाठबळ दिले. त्यातूनच घराच्या छतावर विमान निर्मितीचे स्वप्न सत्यात आले. 2016 मध्ये मेक इन इंडियामध्ये त्यांनी हे विमान प्रदर्शित केले. 2019 मध्ये परमीट टू फ्लाय मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्री. यादव यांचे त्या वेळी विशेष कौतुक केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारकिर्दीत श्री. यादव यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करून सहकार्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, पुढे दुर्लक्ष होत गेल्याने विमान निर्मितीचा प्रवास खडतर बनत गेला. अमोल यादव यांनाही अनेक अडचणीशी सामना करावा लागला. मात्र, विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी 12.91 कोटी रुपये देण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे संशोधनाच्या वाटेवर एक महत्त्वपूर्ण व सकारात्मक पाऊल पडल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

शासनाचा संशोधनासाठी निधी एक सकारात्मक पाऊल
मी पाहिलेले स्वप्न माझ्या एकट्याचे राहिलेले नसून ते जनतेचे बनले आहे. खूप उशीर झाला असला, तरी संशोधनासाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने एक सकारात्मक पाऊल पडले आहे. देशाची गरज बनलेल्या स्वदेशी विमानांचे संशोधन व निर्मिती कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कॅप्टन अमोल यादव यांनी सांगितले.