संतापजनक! आठवडाभर मित्रानेच केला तरुणीवर बलात्कार; टॉर्चर करत गाठली क्रुरतेची सीमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिल्लीमधून (Delhi) महिला अत्याचारांच्या दररोज कोणत्या ना कोणत्या घटना समोर येत असतात. आज देखील अशीच मनाला चिमटा लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका तरुणीवर तिच्याच मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार (Rape Case) केला आहे. तसेच दररोज तिचा वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला. शेवटी सर्व हद्दपार करत या तरुणाने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली. या आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलाचे नाव पारस असे आहे. संबंधित मुलगी पारससोबत एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होती. परंतु 30 जानेवारी रोजी एक पती आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचा फोन पोलिसांना आला. पुढे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेल्यानंतर तरुणीच्या शरीरावर वीस जखमा सापडल्या. यानंतरच हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संबंधित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती आरोपीसोबत फोन कॉलच्या माध्यमातून संपर्कात आली होती. संबंधित तरुणी ही मुळची पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तरुणी नोकरी लागल्यामुळे बंगळुरुत पोहोचण्यासाठी घरातून निघाली होती. परंतु जाताना आरोपीला भेटून जाऊ असे तिने ठरवले. ठरल्याप्रमाणे ती त्याला भेटली. परंतु त्यावेळी तो इथेच थांब आपण तुला दिल्लीत नोकरी शोधू असे आरोपीने तरुणीला सांगितले. या विश्वासावरच तरुणीदेखील आरोपी पारससोबत राहू लागली.

पुढे काही महिने उलटून गेल्यानंतर पारस तरुणीला मारहाण करू लागला. यानंतर त्याने तब्बल एक आठवडा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने ज्यावेळी त्याला नकार दिला तेव्हा पारसने तिला बेदम मारहाण केली. एवढेच करून न थांबता एके दिवशी आरोपीने तरुणीच्या अंगावर गरम डाळ ओतली. यामुळे ती चांगलीच भाजली गेली आहे. दरम्यान, तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीवर कलम 323,
376, 377 अंतर्गत एफआयआर नोंदवली आहे.