शासकीय डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याच्या काही तक्रारी सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आल्या आहेत. आयुक्तांनीही संबंधितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या डॉक्टरांची शोध मोहीम घेतली जात असून खात्री करूनच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने असलेल्या डॉक्टरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

साताऱ्यातील शासकीय रुग्णालयामध्ये सेवा देत असलेले डॉक्टर स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावावर खाजगी रुग्णालय चालवत आहेत. त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा ढासळत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शासकीय डॉक्टरांचे खाजगी दवाखाने शोधण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सातारा सिव्हिल प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली असून असे दवाखाने चालवणारे डॉक्टर आता रडावर येणार आहेत.

शासकीय दवाखान्यात अनेकदा डाॅक्टर नसल्याने रूग्णांची हेळसांड होत असते. त्यामुळे वारंवारं तक्रारीचा पाढा वाचला जात आहे. आता तुकाराम मुंडे यांच्याकडे जबाबदारी आरोग्य विभागाची आल्याने आरोग्य विभागात चांगलेच वातावरण टाईट असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सरकारी डाॅक्टरांचे कुठे- कुठे खासगी दवाखाने आहेत, यांची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे अशा डाॅक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.