Sunday, May 28, 2023

खटाव तालुक्यातील सरपंच संघटनेचे उपोषण तात्पुरते स्थगित

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील सरपंच संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात संघटनेच्यावतीने आज येथे उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला तालुक्यातून वाढता पाठिंबा पाहून तात्काळ तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उदय साळुंखे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमित पंडित यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

पंचायत समिती कामकाजातील कार्यालयीन अडचणी, संग्राम कक्ष सुधारणा, सरपंच, उपसरपंचांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, अधिकारी, कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी मागण्यांसंदर्भात चर्चा, विचार विनिमय होवून गटविकास अधिकारी उदय साळुंखे यांना निवेदन देण्यात आले
होते. मात्र निवेदन देवून दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय साळुंखे व प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आज उपोषण केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे, सचिव डॉ. वैभव माने, संपर्क प्रमुख रोहन जाधव, उपाध्यक्ष अॅड. नितीन शिंगाडे, योगेश जाधव, सचिव सौ. सुनिता मगर, अॅड. कांचन बागल- बोडके, रेश्मा इंगवले, वृषाली विक्रम रोमन, सुरेश शिंदे, लता रमेश गलांडे, हसन शिकलगार, बालाजी निंबाळकर, गजानन कुन्हाडे, किसन मगर यासह गावोगावचे सरपंच उपसरपंच सहभागी झाले होते. उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, डॉ. महेश गुरव, डॉ संतोष गोडसे, राहुल पाटील, ॲड पी.डी.सावंत,रवींद्र काळे, परेश जाधव, अंकुश दबडे,डॉ. हेमंत पेठे, डॉ. कुंडलीक मांडवे, ईश्वर जाधव, धनंजय काळे, चंद्रकांत काटकर,बाळासाहेब काळे आदीसह मान्यवरांनी भेटून उपोषणाला पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांची अधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. सरपंच, उपसरपंचाना तातडीने प्रतीक्षा कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांच्या मनमानीची चर्चा ः- वडूज तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या सरपंच संघटनेच्या उपोषणा स्थळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व पंचायत समिती तील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा बाबतची चर्चा सुरू होती.

योग्य वागणूक न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन ः- सुमारे दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनावर समन्वयक साधी चर्चा झाली असती तर आज ही वेळ आली नसती. परंतू मागण्यापेक्षा जास्त चांगली सकारात्मक व अतिशय समाधानकारक चर्चा करून तहसीलदार किरण जमदाडे व गटविकास अधिकारी उदय साळुंखे यांनी मार्ग काढला. पण यापुढे प. स. अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून कामकाजा संदर्भात सरपंच उपसरपंच योग्य वागणूक न मिळाल्यास आम्ही कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करु असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी दिला आहे.