हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतातील परिवहन क्षेत्रात मोठी क्रांती घडवणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव( Ashwini Vaishnav)) यांनी नुकतीच आयआयटी मद्रासमधील हायपरलूप प्रकल्पाची (Hyperloop project) पाहणी केली. यानंतर त्यांनी त्याच्या विकासासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली-मुंबई (Delhi To Mumbai) किंवा मुंबई-पुणे (Mumbai To Pune) असा प्रवास अवघ्या काही तासांत शक्य होणार आहे. तसेच, हवाई मार्गापेक्षाही जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक प्रणाली उपलब्ध होईल.
आशियातील सर्वाधिक लांबीचा हायपरलूप प्रकल्प
भारतात विकसित होत असलेल्या हायपरलूप प्रकल्पासाठी आयआयटी मद्रासने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येथे 410 मीटर लांबीची हायपरलूप ट्यूब विकसित केली जात आहे, जी आशियातील सर्वात मोठी असेल. यामुळे भारत हायपरलूप तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर आघाडीवर जाईल. लवकरच हा प्रकल्प आणखी विस्तारित होऊन जगातील सर्वाधिक लांबीच्या हायपरलूप ट्यूबचा विक्रम भारताच्या नावावर होणार आहे.
नव्या युगाची कल्पना
2013 मध्ये प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी ‘हायपरलूप अल्फा’ या संकल्पनेद्वारे वाहतुकीच्या नव्या युगाची कल्पना मांडली होती. हायपरलूप ही उच्च-गतीची परिवहन प्रणाली आहे, जिथे प्रवासी कॅप्सूल कमी दाबाच्या (व्हॅक्यूम) ट्यूबमध्ये अत्यंत वेगाने प्रवास करतो. कमी घर्षणामुळे आणि आधुनिक चुंबकीय प्रणालीमुळे हे कॅप्सूल ताशी 1000 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावू शकतात.
प्रकल्पासाठी सरकारचा पाठिंबा
रेल्वे मंत्रालयाने 2022 मध्ये आयआयटी मद्रासला हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 8.34 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. याअंतर्गत प्रकल्पाच्या इलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीत केली जात आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हायपरलूपने जलदगतीने प्रवास करणे शक्य होणार आहे.
मुंबई-पुणे प्रवास काही मिनिटांत शक्य?
मुंबई-पुणे हा देशातील सर्वाधिक रहदारी असलेला मार्ग आहे. सध्या या मार्गावर प्रवासासाठी रेल्वेने 3 ते 4 तास लागतात, तर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे गाड्यांना याहून अधिक वेळ लागू शकतो. हायपरलूपच्या मदतीने हा प्रवास अवघ्या 20 ते 30 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेच्या भविष्यासाठी मोठा गेमचेंजर ठरणार आहे.
दरम्यान, जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर भारतातील मोठ्या शहरांमधील प्रवासाचा संपूर्ण अनुभव बदलून जाईल. वेळेची बचत, कमी ऊर्जा खर्च, वाहतुकीच्या समस्या सुटणे आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली या दृष्टीने हायपरलूप मोठी भूमिका बजावेल. त्यामुळे भारताच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
महत्वाचे म्हणजे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, हायपरलूप प्रकल्पाची प्राथमिक चाचणी लवकरच सुरू होणार आहे. जर सर्व गोष्टी नियोजनानुसार झाल्या, तर येत्या काही वर्षांत भारत हायपरलूपच्या माध्यमातून जलद आणि सुरक्षित प्रवासाच्या नव्या युगात प्रवेश करेल.