औरंगाबाद | मागील 40 वर्षांपासून करण्यात आलेली संतपीठाची मागणी पूर्णत्वास आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले असून येत्या 1 सप्टेंबरपासून संतपीठाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी ग्वाही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
शुक्रवारी डॉ. प्रमोद येवले यांच्या कुलगुरु पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने संतपीठाने आता गती घेत असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आता लवकरच सर्टिफिकेट कोर्स ला सुरुवात करण्यात येणार आहे. विद्यापीठाने आणि शासनाने संतपीठासाठी पन्नास लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देखील जिल्हा नियोजन निधीमधून 1 कोटी रुपयांचा निधी दिला होता. याच निधीमधून संत पिठाच्या इमारतीची डागडुजी इलेक्ट्रिफिकेशन करण्याचे काम सुरू आहे.
शनिवारी पैठण येथील संतपीठामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विद्यापीठातील काही अधिकारी तसेच संत साहित्यामध्ये ज्यांचे चांगले योगदान आहे असे 50 मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला काही सर्टिफिकेट कोर्स करण्याची कल्पना घेऊन लवकरच अमलात आणण्यात येईल, असे प्राध्यापक प्रमोद येवले यांनी सांगितले.त्याचबरोबर ‘एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’,ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत आणि लवकरच एक पीजी डिप्लोमा सुरू करत आहोत असेही ते म्हणाले.