औरंगाबाद | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना पकडले आहे. सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे हा प्रकार घडला. आदिवासी वस्तीसाठी मंजूर झालेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामचा धनादेश देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री रंगेहात पकडले. याबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र कृष्णराव भोपे वय 48 वर्षे असे या आरोपीचे नाव आहे. गजानन नगर येथे तो राहत होता.
हाती आलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा याठिकाणी आदिवासी वस्ती आहे. या वस्तीसाठी मंजूर मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा उर्वरित तीन लाखाचा धनादेश मिळावा यासाठी तक्रारदार भोपे यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी 15 हजार रुपये लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीसोबत सोमवारी सायंकाळी त्यांच्यासोबत दोन पंच पाठवले. आणि झालेल्या लाचेच्या मागणीची तपासणी केली. यानंतर भोपे यांनी तडजोड करत 15 हजारांवरून 10 हजार रुपयांपर्यंत लाच घेण्याची तयारी दर्शवली.
रात्री सात वाजेच्या सुमारास लाचेची रक्कम घेऊन उल्कानगरी येथील चेतक घोडा चौकात येण्यासाठी सांगितले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत द्वारे, संदीप राजपूत, हवालदार बाळासाहेब राठोड, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी केली.