Tuesday, October 4, 2022

Buy now

तीन महिन्यापूर्वीचा खूनाचा उलगडा : बहिणीला त्रास देणाऱ्या युवकाचा गळा चिरून खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पाडेगाव (ता. खंडाळा) येथे तीन महिन्यांपूर्वी युवकाचा गळा चिरून झालेला खुन करण्यात आला होता. सदरील खून बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून झाल्याचे समोर आले असून चाैघांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. राहूल नारायण मोहिते (वय- 31, रा. पाडेगाव, ता. फलटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

या गुन्ह्यात गणेश बापू कडाळे व दत्ता मारुती सरक (दोघे रा. पाडेगाव), प्रकाश ऊर्फ अजित किसन गोदेकर व योगेश श्रीरंग मदने (दोघे रा. कोरेगाव, ता. फलटण) अशी संशयित चाैघांची नावे आहेत. चाैघांनाही लोणंद पोलिसांनी अटक केली असून तीन महिन्यापूर्वी घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 10 मे रोजी पहाटेच्या सुमारास घराबाहेर खॉटवर झोपलेल्या राहुल मोहिते या तरुणाचा गळा चिरून खून झाला होता. घटनास्थळावरून सुगावा लागेल, अशा कोणत्याही वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते. अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे व पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे हे तपासावर लक्ष ठेवून होते. गेले तीन महिने लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत होते. त्याला यश आले आहे. या खूनप्रकरणी चार जणांना अटक केली असून, अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे