व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : बाप लेकानं काढला मावस भावाचा काटा; अवघ्या 3 तासात पोलिसांनी घटनेचा छडा लावत केली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| फलटण तालुक्यातील मलवडी येथे गुरुवारी सकाळी एका तरुणाची खुनाची घटना समोर आल्यानंतर मलवडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहिती व पुराव्यांच्या आधारे या खूनप्रकरणी खून झालेल्या युवकाचा मावसभाऊ असलेल्या पोपट खाशाबा मदने याला अटक केली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासात खुनाचा छडा पोलिसांनी लावला असून पोपट मदने याने मुलाच्या मदतीने अनिल चव्हाण याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलवडी येथे मामाकडे रहात असलेल्या अनिल नामदेव चव्हाण (वय 42) हा प्रात:विधीसाठी मलवडी गावातील फॉरेस्ट नावाच्या शिवारात गेला होता. अज्ञाताने त्याच्या डोक्यात वार करुन निर्घृणपणे हत्या केली होती. फलटण पोलिसांना याबाबत सकाळी 8 वाजता माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनाम्यानंतर अनिल चव्हाण याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मयत अनिल नामदेव चव्हाण याचा खुन हा महिलांबाबतच्या त्याच्या गैरवर्तणुकीच्या कारणावरुन झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतु त्याचा सख्खा मावसभाऊ असलेला आरोपी पोपट खाशाबा मदने हा तो मी नव्हेच या आविर्भावात गुन्ह्याचे घटनास्थळावर बघ्यांचे गर्दीमध्ये वावरत होता. तो पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.

मात्र, याच वेळी पोलीसांनी बघ्यांच्या गर्दीमधून आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोली चाणाक्षपणे हेरुन त्यास संशयाच्या आधारे चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला 3 तास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभुल करणारी माहिती सांगत होता. परंतु पोलीसांनी प्राप्त परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्याचेवर कौशल्यपूर्णरीतीने विविध प्रश्नांची सरबत्ती करीत त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल नामदेव चव्हाण याचा खुन केल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी ाहुल धस यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वाखाली स. पो. नि. नवनाथ रानगट, स. पो. नि. अशोक हुलगे, पो. उ. नि. सागर अरगडे, पो. उ. नि. प्रमोद दीक्षत, पो. उ. नि. पाटील, पोलीस अमंलदार संजय अडसुळ, गार्डी, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे या पोलीस अधिकारी व अमलदारांनी केलेली आहे.