औरंगाबाद | वाहनात बसण्याची जबरदस्ती करत ट्रॅव्हल्स एजंट कडून महिलेसोबतच कुटुंबियांवर चाकूने वार केल्याची घटना मध्यवर्ती बसस्थानकाजवळ उघडकीस आली आहे.बुधवारी मध्यरात्री 10 वाजेच्या सुमारास एका महिलेच्या मागे लागून तिला खासगी वाहनात बसण्यासाठी विचारणा करणाऱ्या एजंट ने तिच्या कुटुंबाला मारहाण करत या महिलेच्या बहिणीवर वार केला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय तरुणी बुधवारी अजिंठा ला जाण्यासाठी सकाळी कुटुंबासह बसस्थानकावर गेली होती. बसची वाट बघत असताना ट्रॅव्हल एजंट विलास उर्फ विल्या दिलीप साळवे याने त्यांना खाजगी वाहनात बसण्याचा आग्रह धरला. यावेळी त्या तरुणीने एसटी बस द्वारे जाणार असल्याचे सांगितले तरीही विलास ने विचारणा सुरुच ठेवली. यामुळे त्यांच्यात वाद झाला. काही वेळाने हा वाद मिटला. रात्री हे कुटुंब अजिंठ्यावरून परतल्यानंतर विलास त्यांची वाट बघत होता. यानंतर त्याने या कुटुंबियांना अडवत त्या महिलेचा तिचा पती, बहीण, भावजयला शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. त्याचबरोबर त्याने तरुणीच्या बहिणीच्या कानामागे चाकूने वार करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या खाजगी एजंटला अडवण्याची जबाबदारी ही एसटी प्रशासनाची असून त्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत, परंतु त्यांच्याकडून या एजंटची अडवणूक होत नाही. बसस्थानकावर सततया एजंटचा सुळसुळाट बघायला मिळतो. त्यांची महिलेची हात धरे पर्यंत मजल जाते. त्याचबरोबर यामध्ये अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार देखील असल्याचे निदर्शनास आले आहे.