अलिबाग ते श्रीवर्धन…. रायगड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा निकाल असा लागेल

Raigad Vidhan Sabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वराज्याची पहिली राजधानी.. अस्सल गाव खेड्यातला कोकण ते दुसऱ्या टोकाला मुंबईत मिसळलेला रायगड जिल्हा… इथलं राजकारणही इथल्या दऱ्याखोऱ्यांसारखं किचकट, गुंतागुंतीच आणि समजून घ्यायला अवघड… अगदी चालू स्थितीबद्दल बोलायचं झालं तर रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सात विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा दबदबा आहे…तर महाविकास आघाडी शून्यावर आहे… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सगळे बुरुज ढासळले असले तरी रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघावर महायुतीच्याच उमेदवारांनी सरशी मारली… त्यामुळे अदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, प्रशांत ठाकूर या राजकारण्यांपासून ते उरण, पेण आणि अलिबाग सारख्या अटीतटीच्या मतदारसंघात यंदा आमदार कोण होतोय? रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय? आमदार कोण होतोय? तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो कर्जतचा… 2019 ला राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना धोबीपछाड देत शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार झाले.. शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात सामील झाले… मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभेतून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळाल्याने थोरवे यांची आमदारकी डेंजर झोनमध्ये आहे… त्यात अजित पवार गटाचे सुधाकर घारेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने आमदार साहेबांचं टेन्शन वाढवलंय… त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर घारे तुतारी वाजवणार किंवा मशाल पेटवणार यावर इथलं पुढचं राजकारण स्पष्ट होईल.. पण सध्यातरी कर्जत – खालापूरचा कौल मविआच्या बाजूने आहे.. त्यात ठाकरे गटाकडून नितीन सावंत हे ही उमेदवारीच्या रिंगणात आहेच..

दुसरा मतदारसंघ आहे तो श्रीवर्धनचा…राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या श्रीवर्धनच्या विद्यमान आमदार… शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना तब्बल 38 हजार 783 मतांनी मात देत आदिती तटकरे निवडून आल्या… मंत्रीही झाल्या… सध्याच्या घडीला श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे गट ऍक्टिव्ह आहे… म्हणूनच लोकसभेलाही पक्षफुटीचा फारसा इम्पॅक्ट न पडता श्रीवर्धनने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं… त्यामुळे सध्या तरी अदिती तटकरे यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत नाहीये… पण शरद पवारांनी ज्या काही मोजक्या मतदारसंघात तरुण फ्रेश चेहरे देण्याचा निर्धार केलाय… त्यात श्रीवर्धनचाही समावेश असल्याने आता शरद पवार प्लस उद्धव ठाकरे प्लस शेकाप यांनी काही मेखा टाकल्या तर अदिती तटकरे यांना कडवं आव्हान उभं राहू शकतं, एवढं मात्र नक्की…

तिसरा मतदारसंघ अलिबागचा… शेकापच्या सुभाष पाटील यांना तब्बल 32 हजार 924 मतांनी बॅक फुटला टाकत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी आमदारकी खेचून आणली… अर्थात जिल्ह्यातील सर्वच आमदारांप्रमाणे दळवीदेखील शिवसेनेच्या फुटीत शिंदें सोबत गेले… शेतकरी कामगार पक्षाशी हाडवैर असणारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पंगा घेणारे आमदार म्हणून दळवींची ओळख… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अलिबागने महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने दळवी यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे, असं म्हणायला हरकत नाही… मात्र भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्याने महायुतीत अलिबागसाठी जागा वाटपाचा तिढा वाढू शकतो… दुसऱ्या बाजूला शेकापकडून चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडित पाटील, एडवोकेट. आस्वाद पाटील इच्छुक आहेत… काँग्रेसकडूनही प्रदेश सचिव एडवोकेट. प्रवीण ठाकूर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे… मात्र शिंदे गटाच्या महेंद्र दळवी विरुद्ध कोण? यावर आत्ताच स्पष्ट बोलणं थोडसं चुकीचं ठरेल…

चौथा मतदारसंघ पेणचा…भाजपचे रवीशेठ पाटील पेणचे विद्यमान आमदार… शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांचा पराभव करत त्यांनी आमदारकी खेचून आणली होती… तसं पाहायला गेलं तर 40 वर्ष हा मतदारसंघ शेकापचा अभेद्य बालेकिल्ला होता… पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत शेकाप 24 हजार मतांनी पिछाडीवर फेकली गेली… त्यामुळे आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान शेकाप समोर असणार आहे.. त्यातही धैर्यशील पाटील भाजपवासी झाल्याने मतदार संघातील महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे.. लोकसभेला धैर्यशील पाटील यांनी दोन पावलं मागे घेतल्याने येणाऱ्या विधानसभेला कुणाला तिकडे द्यायचं? याचं मोठं संकट भाजप समोर असणार आहे…

पाचवा मतदारसंघ उरणचा…2019 ला अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ते भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे… मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला 13 हजारांचं जबरी लीड मिळाल्यामुळे इथे मविआतून लढत देण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालीये… मात्र, विधान परिषदेच्या निकालानंतर मविआमध्येही मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत. विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पराभवाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत अशा प्रतिक्रिया उघडपणे उरण, पेण पट्टयातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते देऊ लागले आहेत. काहीही झाले तरी उरणमध्ये उद्धव सेनेला साथ द्यायची नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची अशी भाषा आता शेकापचे नेते करू लागले आहेत… त्यामुळे ही सगळी स्थिती विद्यमान आमदार बालदी यांच्याच पथ्यावर पडण्याचे चांसेंस जास्त आहेत… सध्या तरी उरण मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकापचे राजेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केली आहे…

सहावा मतदारसंघ पनवेलचा…भाजपचे प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेचे विद्यमान आमदार… 2019 ला शेकापच्या हरेश केनी यांचा तब्बल 92 हजार 730 मतांनी एकहाती धुव्वा उडवत आमदारकी खेचून आणली होती… या मतदारसंघात आजही ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व आहे… त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीतही ठाकूर यांच्यासाठी चौथ्यांदा घोडामैदान सोपं असेल…मात्र आघाडीकडून बाळाराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर काट्याने काटा काढावा अशी लढत होऊ शकते…

सातवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो महाडचा…2009 साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंनी तिकीट दिलं आणि ते जिंकलेही. 2009 नंतर 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा भरत गोगावले यांनी महाडची आमदारकी एकहाती जिंकत हॅट्रिक साधली… माणिकराव जगताप यांनी प्रत्येक वेळेस कडवी झुंज दिली.. पण ती अपयशी ठरली… दरम्यानच्या काळात माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणावा असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाही… पण शिवसेनेत फूट पडणं… गोगावले शिंदे गटात जाणं… यामुळे महाड मधील शिवसेना दुभंगली… गोगावलेंची ताकद कमी झाली… लोकसभा निवडणुकीत तर त्याचे दृश्य परिणाम दिसून आले… महाड मधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गोगावले अवघ तीन हजाराचं निसटत लीड देण्यात काठावर पास झाले… त्यात जगतापांची कन्या स्नेहल जगताप यांनी आमदारकीचं मैदान तापवल्याने जगताप विरुद्ध गोगावले अशी महाडमध्ये घासून लढत होऊ शकते…तर असा होता रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा येणाऱ्या निवडणुकीतला सविस्तर राजकीय आढावा… बाकी या मतदारसंघात कोण निवडून येईल? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..