‘द स्काय इज पिंक’ – नात्यांची वीण घट्ट करणारा वास्तव प्रवास

चंदेरी दुनिया | योगेश नंदा सोमनाथ

घरातील एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते तेव्हा पूर्ण घरंच आजारी पडतं. हे आजारपण कुणालाही वाटता येत नाही. आजारी व्यक्तीची काळजी करायची, ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्न करायचे एवढंच बाकीच्यांच्या हातात. हे आजारपण एकमेकांवरील प्रेम वाढवत असलं तरी धाकधुकीचा एक क्षणही जीवनातून जाऊ देत नाही. कुणावर रुसणं असूदे किंवा आत्यंतिक जीव लावणं, सगळ्या गोष्टी या कॅलक्युलेटेड रिस्क घेऊनच कराव्या लागतात. अशाच कौटुंबिक नातेसंबंधातील धागे अलगद उलगडून दाखवणारा आणि सत्यकथेवर आधारलेला चित्रपट म्हणजे ‘द स्काय इज पिंक’

निरेन चौधरी आणि त्याच्या कुटुंबियांचा, आयेशा या आपल्याच मुलीच्या जीवनातील SCID (सिव्हीअर कंबाईंड इम्युनो डिफिशियंसी) आजाराविरुद्धचा लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आपल्याकडे सामान्य कुटुंबात एखाद्या लहान मुलाला गंभीर आजार झाला तर त्याच्या आजारपणाचं स्वरूप आणि खर्चाचं गणित जुळवून त्या मुलाला जगवायचं की नाही याचा विचार केला जातो. लहान बाळाची ती काय प्रतिकारशक्ती असणार असा विचार करत, पुढे जाऊन गुंतागुंत वाढवण्यापेक्षा आधीच बाळ जेवढं जगतय तेवढं जगू द्यायचा विचार पालकही करतात. जन्माला आलेला प्रत्येक जीव महत्वाचा आहे, आणि त्या जीवाला आपलंसं मानलं की जे करावं लागतं त्या सगळ्याची गुंफण द स्काय इज पिंक मध्ये आहे.

आयुष्यात प्रत्येकाचंच एक आकाश असतं. ते आकाश अधिक आनंदानं, संपन्नतेनं भरून टाकण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यात वाट्याला आलेली दुःख नाकारता येत नाहीत. अशा सगळ्या रंगाच्या सुख-दुःखाचं आकाश नक्की कोणत्या रंगाचं असेल असं विचारलं तर नक्कीच प्रत्येकाचं उत्तर एक नसणार. त्यामुळं आपल्या जीवनाचे रंग आपणच ठरवायचे, आपणच भरायचे हा सोपा अर्थ सांगणारा हा चित्रपट आहे.

आयेशा चौधरी (झायरा वासीम) या scid ग्रस्त दुर्धर मुलीची ही कहाणी. तिचे वडील निरेन चौधरी ज्यांना ती लाडाने पांडा म्हणते (फरहान अख़्तर) आणि आई अदिती चौधरी जी तिच्यासाठी मूज (प्रियांका चोप्रा) आहे. ईशान नावाचा आयेशाचा भाऊसुद्धा तिच्या आयुष्यातील सुरुवातीच्या घटनांपासूनचा साक्षीदार आहे. नोकरी आणि आजारपणावरील उपचार या दुहेरी कात्रीत अडकलेल्या चौधरी कुटुंबाची भारत आणि लंडनवारी सातत्याने सुरूच असते. दुर्धर आजारात पहिली मुलगी गमावल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वाट्यालाही तीच परिस्थिती येऊ नये म्हणून धडपडणाऱ्या अदिती आणि निरेनची कहाणी चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

या दोघांच्या वैवाहिक जीवनातील २५ वर्षांचा काळ चित्रपटात दाखवण्यात आला आहे. लग्न झालं की मुलं होतात आणि मग आपली जबाबदारी संपते का या विचारांची पडताळणी करण्यासाठी हा सिनेमा उपयोगी पडतो. नवरा आणि बायकोमधील नात्याची सहजता एकमेकांवर रुसण्या-फुगण्यात, एकमेकांच्या चुका दाखवण्यात आहे तितकीच ती एकमेकांना समजून घेऊन पुढे जाण्यात आहे याची समर्पक दिशा हा चित्रपट दाखवून देतो. मुलांचं बालपणातील संगोपन करताना, मुलांना वाढवताना आई-वडिलांच्या भूमिका कशा बदलतात, मुलांच्या आयुष्यात ‘स्पेस’ देणं म्हणजे काय, आहे त्या क्षणांचा आनंद लुटताना – आलेल्या दुःखालाही सकारात्मकतेनं कसं दूर सारता येईल याची दिशा हा चित्रपट तुम्हाला देतो.

वास्तव घटनेवर आधारलेला हा चित्रपट उत्तरार्धात तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्याशिवाय राहत नाही. आपण कुणासाठी, किती आणि काय करतो याचा हिशोब मांडला तर ते आयुष्य मतलबी वाटेल. त्यापेक्षा एकमेकांना आधार देत, ‘मी तुझाच आहे, तुझ्यासाठीच आहे’ हे चार शब्दही आयुष्याचं आकाश बदलून टाकतील, हे समजण्यासाठी नक्की पहा – ‘द स्काय इज पिंक’

(चित्रपटांतील सर्वच पात्रांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे. प्रियांकाने साकारलेली आईची भूमिका लाजवाब आहे. अस्वस्थ, काहीसा गंभीर पण काळजीपूर्वक राहणारा बाप फरहानने साकारला आहे. झायरा ही तिच्या नेमक्या भूमिकेतही परिणामकारक आहे. रोहित सराफ या नवोदित कलाकाराने आयेशाच्या भावाची केलेली भूमिका, विशेषतः झायरा अडचणीत असताना त्यानं फोनवर केलेलं बोलणं हे लक्षात राहण्यासारखं आहे.)

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

You might also like