एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! सरकारकडून वेतनासाठी 378 कोटींची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने दिवाळी मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी दिली आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 378 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे यंदा एसटी कर्मचारी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करू शकणार आहेत.

गेल्या काही काळापासून एसटी कर्मचारी सरकारवर नाराज असल्याचे चित्र दिसत होते. सरकार कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही अशी टीका वारंवार एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यांची हीच नाराजी लक्षात घेत यावर्षी दिवाळीपूर्वीच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 387 कोटींची मदत दिली आहे. त्यामुळे त्या तीन ते चार दिवसांमध्येच एसटी महामंडळाकडून सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल. या कारणामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली आहे.

यापूर्वी राज्य सरकारने स्त्री कर्मचाऱ्यांना पाच हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर, सण अग्रिम म्हणून साडे बारा हजार रुपये देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता सरकारने महामंडळाला 387 कोटींची मदत केली आहे. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 80 कोटींचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परंतु आता सरकारने केलेल्या मदतीमुळे एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन करणे सोपे जाणार आहे.