पुणे हे केवळ शिक्षण आणि माहिती-तंत्रज्ञानाचं केंद्र नाही, तर आता हवाई सेवांचंही एक महत्त्वाचं हब बनण्याच्या वाटेवर आहे. राज्यातील पहिलं ‘हेलिपोर्ट’ हडपसर येथे उभारण्याची घोषणा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली असून, हे केवळ हेलिकॉप्टरसाठीचं केंद्र न राहता, देशातील पहिली आणि जागतिक दर्जाची एव्हिएशन गॅलरीही येथे साकारण्यात येणार आहे. हडपसरमधील २३० एकर क्षेत्रफळावर सध्या कार्यरत असलेले ग्लायडिंग सेंटर आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (AAI) सुपूर्त होणार असून, यानंतर येथे सुसज्ज हवाई केंद्र उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात हेलिकॉप्टरच्या उड्डाणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, व्यवसाय, वैद्यकीय आपत्कालीन सेवा आणि पर्यटन यासाठी स्वतंत्र हेलिपोर्टची गरज भासत होती. हे लक्षात घेऊन हडपसरमधील हा प्रकल्प आकाराला येणार असून, यामुळे मुख्य विमान उड्डाणांवरील ताणही कमी होईल. याशिवाय येथे उभारण्यात येणारी एव्हिएशन गॅलरी ही एकमेव अशी संस्था असेल, जिथे सामान्य लोक, विद्यार्थी आणि पर्यटकांना हवाई क्षेत्राचा इतिहास, विकास आणि तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष सिम्युलेटर, डिजिटल इंटरॅक्टिव्ह डेमो आणि ऐतिहासिक प्रदर्शनांच्या माध्यमातून मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ९९ वर्षांच्या कालावधीसाठी ही जमीन AAI ला केवळ प्रतीवर्ष एक रुपया या नाममात्र दराने हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक संपत्तीचा शाश्वत आणि दूरदृष्टीने उपयोग केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पुणे हे नागरी विमानसेवेचं प्रमुख केंद्र ठरेल. इतकंच नव्हे तर, अजून एक हेलिपोर्ट पुणे जिल्ह्यात उभारण्याचा मानस असून, त्यासाठी दुसरी जागा शोधण्यात येत आहे.
हडपसरचा हा प्रकल्प पुण्याला आंतरराष्ट्रीय एव्हिएशन नकाशावर अधोरेखित करणार असून, नागरिकांसाठी पर्यटन, शिक्षण आणि हवाई सेवांच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी ठरणार आहे.