औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनामुळे शहरात सकाळी सात ते सायंकाळी चार पर्यंत बाजारपेठा उघड्या ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. या वेळेमध्ये नागरिकांची बाजारपेठेत तर रस्त्यावरती वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
डेल्टा प्लसला रोखण्यासाठी शहरामध्ये निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गेल्या 24 तासात शहरात तब्बल 74 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. तरीही नागरिक मुक्तपणे गर्दीच्या ठिकाणी संचार करताना दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी खरेदीसाठी बिनधास्तपणे नागरिक गर्दी करत आहेत.
आज मोठ्या प्रमाणावर पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. काही नागरिक विना मास्क देखील वावरत होते. शासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की कामानिमित्त बाहेर पडा. मात्र या ठिकाणी कुणालाही कोरोना संसर्गाची भीती जाणवत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी करून नागरिक जणू कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत.