Monday, February 6, 2023

चोरट्यांनी काढला राग अन् दुकानातील कपडेच जाळली

- Advertisement -

कराड | सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चादर टाकून वडगांव हवेली (ता. कराड) येथील चार दुकानांसह एका घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोकड लंपास केली. तसेच गावातीलच एका लाँड्री दुकानात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या चोरट्यांनी इस्त्रीसाठी आलेले सर्व कपडे एकत्र करून त्यावर इस्त्री चालू करुन ठेवली. त्यामुळे येथील सर्व कपडे जळून खाक झाले आहेत.

वडगाव हवेली परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मुख्य रस्त्यावरील अशोक चव्हाण व सचिन चव्हाण यांच्या मेडिकल दुकानाचे शटर कटावनीने उचकटून दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चादर टाकून दुकानातील रोकड लंपास केली. अशोक चव्हाण व सचिन चव्हाण यांच्या दुकानातून अनुकमे 15 हजार व 7 हजार रुपये व काही किमती औषधे लंपास केली. तसेच गावातीलच प्रमोद साळुंखे यांच्या दुध संकलन केंद्राचे कुलूप तोडून येथीलही काही रोख रक्कम लंपास केली.

- Advertisement -

शेजारीच असलेल्या भिमराव गायकवाड यांच्या लाँड्री दुकानात प्रवेश केला. तेथील ड्राव्हर मध्ये रोख रक्कम नसल्याचे लक्षात आल्यावर इस्त्रीसाठी आलेले सर्व कपडे एकत्र करून त्यावर इस्त्री चालू करुन ठेवली. त्यामुळे येथील सर्व कपडे जळून खाक झाली. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील शिवानंद साळुंखे यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरगुती साहित्याची नासधूस केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.