हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. सध्या जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरु आहे, असे दलाई लामा यांना म्हणले आहे. शनिवारी दलाई लामा यांनी कालचक्र मैदानावर प्रवचन केले. यावेळी त्यांनी, मानवजातीला पुढे सहन कराव्या लागणाऱ्या धोक्यांची चाहूल दिली.
प्रवचनवेळी बोलताना दलाई लामा म्हणाले की, “आधीच जगाला अहंकार, राग आणि मत्सरामुळे दोन महायुद्धांचा सामना करावा लागला आणि आता तिसऱ्या महायुद्धकडे वाटचाल सुरु आहे. ही चिंतनाची बाब आहे. विध्वंसक शक्तींमधून स्वार्थी प्रवृत्ती निर्माण होतात. याच्या प्रभावाखाली आपण युद्ध आणि संघर्षात अडकतो. एकमेकांना मारतो आणि इजा करतो”
त्याचबरोबर, “तुमच्यामध्ये शांतता असेल तरच तुम्ही तुमच्या सभोवताली शांतता निर्माण करू शकाल. हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणार्या अहंकारी वर्तनाचा त्यांनी निषेध केला. तसेच मानवांच्या एकतेच्या संकल्पनेसाठी सर्व समान असणे आवश्यक आहे. जीवनाचा उद्देश समजून घेणे आणि ते योग्यरित्या जगणे सर्वात महत्वाचे आहे. करुणेशिवाय मानवी अस्तित्व शक्य नाही. सुख बाहेरून कुठूनही येत नाही. ते तुमच्या स्वतःच्या कृतीतून निर्माण होते. प्रत्येक दुःखाचे कारण अज्ञान आहे.” असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना, “पुण्य कर्म करण्यात घाई करावी आणि पापकर्म करण्यापासून मन वळवावे. त्रास दूर केल्यानेच मन शुद्ध आणि नैसर्गिक बनते.ज्या व्यक्तीचे मन शांत असते, त्याचे बोलणे आणि कृतीही चांगली असते. बौद्ध धर्मग्रंथांचे वाचन करा, त्यांचे चिंतन करा आणि आचरणात आणून जीवन कल्याणकारी करा”, असा सल्ला दलाई लामा यांनी दिला.