निधी वाटपाचा मुद्दा टोकाला पेटला! अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये शाब्दिक चकमक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. दोन नेत्यांमध्ये झालेल्या या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत थेट अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे. हा वाद टोकाला गेल्यानंतर दोन्ही नेत्यांना शांत करण्यासाठी आमदार उदयसिंग राजपूत यांना मध्ये पडावे लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर आमदार ही भाजपसोबत गेल्यामुळे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट विभागले गेले आहेत. या दोन्ही गटात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद पाहायला मिळत आहे. आता हाच वाद औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला आहे. आजच्या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी निधी वाटपावरुन जिल्हा नियोजन समितीत प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उचलून धरला. या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची सुरू झाली. तर निधी वाटपावरुन पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांना उत्तर दिले. यावेळी राजपूत यांची बाजू घेत अंबादास दानवे यांनी मध्यस्थी केली. परंतू या वादात दानवे आणि भुमरे यांच्यात हमरीतुमरी पाहायला मिळाली. हा वाद एवढा पेटला की, दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर आले. तेव्हा इतर नेत्यांना मध्ये पडून हा वाद मिटवावा लागला. या सर्व घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ आता चर्चेचे कारण बनला आहे.
संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया
आता या दोन्ही नेत्यांचा वाद मिटवण्यात आला असून या सर्व प्रकाराबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही” अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.