राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही कारण.., छगन भुजबळांचं वक्तव्यं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळेच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ही वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मराठा समाजाने देखील छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “राज्यात आता मराठा शिल्लक राहणार नाही, कारण सगळे मराठा कुणबी होत आहेत” असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, “राज्यात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा आता महाराष्ट्रमध्ये शिल्लक राहणार नाही. सर्व कुणबीच होणार आहेत. तुम्ही किती ही क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा नवीन बिल आणा, मात्र जर सर्व मराठा कुणबी म्हणून ओबीसीमध्ये येत आहेत, तर बाहेर कोण राहणार आहे”

त्याचबरोबर, “ज्याप्रमाणे दादागिरीने कुणबी सर्टिफिकेट घेतात, खोटी सर्टिफिकेट घेतात. तसेच पुढे सुद्धा होणार आहे. जात पडताळणीच्या वेळेलाही असेच होणार आहे. कोणी फोन करणार, कोणी दादागिरी करणार आणि जात पडताळणी करून घेणार, जर सर्व मराठा ओबीसीमध्ये येणार असतील तर, काय करायचं ओबीसीवर चर्चा घेऊन. सर्व सर्टिफिकेट घेत आहेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आता काही शिल्लक राहिलेले नाही, आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक नाही, सर्व कुणबी झाले आहेत” असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी केेलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांना मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्याकडून काय  प्रत्त्युतर देण्यात येइल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.