हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दूरवर पसरलेला समुद्रकिनारा आणि त्याची शांतता कायम आपल्याला आकर्षित करते. समुद्रात फेसाळणाऱ्या लाटा, सरकणारी वाळू आणि थंडगार वारा जेव्हा अंगाला स्पर्श करतो तेव्हा एक सुखद अनुभव मिळतो. जो शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही असे बरेच समुद्रकिनारे फिरले असाल. शांत, निवांत, सुंदर आणि नयनरम्य दृश्यांनी समृद्ध.. पण तुम्ही कधी रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात चमकणारे समुद्रकिनारे पाहिले आहेत का? आपल्या भारतात अशा काही समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. जे रात्रीच्या अंधारात चमकतात. चला जाणून घेऊया.
कुठे आहेत?
आपल्या भारतात अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक वास्तू तसेच ठिकाणे आहेत. जी एक्स्प्लोर करण्यात काही वेगळीच मजा आहे. खास करून भारतातील समुद्र किनारे. प्रत्येक समुद्र किनाऱ्याची एक खासियत आणि वैशिट्य आहे. अशा या समुद्र किनाऱ्यांमध्ये काही समुद्रे किनारे असे आहेत जे रात्रीच्या अंधारात चांदण्यांसारखे चमकतात. महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, केरळ, अंदमान- निकोबार या ठिकाणी हे समुद्र किनारे आहेत. चला या समुद्रकिनाऱ्यांविषयी अधिक जाणून घेऊया.
महाराष्ट्र – मालवण समुद्र किनारा
महाराष्ट्रातील मालवण हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असे ठिकाण आहे. जिथला समुद्रकिनारा पाहणे अत्यंत सुखद अनुभव देणारे आहे. खास करून मालवण समुद्र किनारा रात्रीच्या वेळी पाहणारा आयुष्यात ते दृश्य विसरू शकत नाही. कारण हा बीच रात्रीच्या अंधारात अगदी आकाशातील ताऱ्यांसारखा चमकतो. जे पाहणे फारच आल्हाददायी आहे.
गोवा – पालोलेम बीच
गोवा नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिला आहे. गोव्यातील पालोलेम बीच अत्यंत वेगळा आणि अद्भुत आहे. रात्रीच्या वेळी लखलख चमकणारा हा समुद्रकिनारा एका अत्यंत सुंदर दृश्यासह मनाला वेगळाच आनंद देतो. त्यामुळे गोव्याला गेलात तर रात्रीच्या वेळी पालोलेम बीचचे निखळ सौंदर्य पहायला जरूर जा.
पश्चिम बंगाल – मंदारमणी बीच
पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मंदारमणी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी ताऱ्याप्रमाणे चमकतो. त्यामुळे हा बीचसुद्धा सर्वत्र प्रसिद्ध आहे.
केरळ – वर्कला समुद्रकिनारा
केरळमधील वर्कला बीच ज्याला ‘पापनाशम बीच’ असेही म्हटले जाते. हा भारतातील केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला नगरपालिकेच्या वर्कला टाउनमध्ये आहे. हा समुद्रकिनारा देखील रात्रीच्या अंधारात चमचम करतो. हा अद्भुत नजारा पहायला अनेक लोक रात्रीच्या वेळी या ठिकाणी जातात.
अंदमान आणि निकोबार – राधानगरी बीच
अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावर असणारा राधानगरी बीचसुद्धा रात्रीच्यावेळी चमकतो. मुख्य म्हणजे हा बीच रात्रीच्या काळोखात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या रोषणाईने उजळलेला दिसतो.
समुद्र किनाऱ्यांच्या चमकण्यामागील कारण काय?
भारतामध्ये असणारे हे समुद्रकिनारे रात्रीचे चमकतात आणि त्यामुळे या समुद्र किनाऱ्यांना अद्भुत मानले जाते. मात्र त्यांच्या चमकण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ते म्हणजे ‘बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन’. या समुद्रकिनारी तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता. कारण या ठिकाणी बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनची उपस्थिती असते. वर्षाच्या ठराविक काळात, बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन लाटांच्या हालचालीवर प्रतिक्रिया देत. ज्यामुळे हे समुद्रकिनारे रात्रीच्या वेळी चमकतात.