जम्मू-काश्मीरला भारताचे नंदनवन मानले जाते. तिथले बर्फाच्छादित पर्वत, निसर्गरम्य दऱ्या आणि स्वच्छ, थंड हवामान हे पर्यटकांना आकर्षित करणारे घटक आहेत. मात्र, भारतात अशी अनेक हिल स्टेशन्स आहेत जी सौंदर्यात आणि हवामानात जम्मू-काश्मीरच्या तोडीस तोड आहेत. शिमला, मसुरी आणि बिनसर ही अशीच काही ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव येईल.
शिमला – पर्वतांची राणी
हिमाचल प्रदेशची राजधानी असलेले शिमला हे ब्रिटिश काळापासून लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे थंड हवामान आणि हिरवीगार पर्वतरांगांमुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मॉल रोड, जाखू मंदिर, कुर्फी स्नो पॉइंट आणि क्राइस्ट चर्च ही प्रमुख आकर्षण स्थळे आहेत. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टी पाहायला मिळते, तर उन्हाळ्यात आल्हाददायक थंडी अनुभवता येते.

मसुरी – निसर्गरम्य सौंदर्याचा अनोखा मिलाफ
उत्तराखंडमधील मसुरी हे ‘पहाडों की रानी’ म्हणून ओळखले जाते. गंगा आणि यमुना नद्यांच्या दऱ्यांमध्ये वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आहे. केम्प्टी फॉल्स, गन हिल, लंढौर बाजार आणि लाल टिब्बा येथे फिरण्यासाठी उत्तम आहेत. येथे वॉटरफॉल्स, धुक्याचे पडदे आणि घनदाट जंगल पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात.

बिनसर – शांतता आणि निसर्गसौंदर्याचा मिलाफ
उत्तराखंडच्या कुमाऊँ पर्वतरांगांमध्ये वसलेले बिनसर हे पर्यटकांसाठी स्वर्ग आहे. येथून हिमालयातील नंदा देवी, त्रिशूल आणि पंचचुली शिखरांचे विहंगम दृश्य दिसते. बिनसर वन्यजीव अभयारण्य हे पक्षीप्रेमी आणि ट्रेकिंगप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे गर्दी कमी असल्याने शांत वातावरणात निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.

ही सर्व हिल स्टेशन्स निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची संधी देतात. जर तुम्हाला जम्मू-काश्मीरला पर्याय हवा असेल, तर शिमला, मसुरी आणि बिनसर नक्कीच उत्तम पर्याय आहेत!




