हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उद्या फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे 1 मार्च 2025 पासून अनेक नियम बदलणार आहेत. हे बदल तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करू शकतात. त्यामुळे नेमके कोणते नविन नियम लागू होणार आहेत, जाणून घ्या.
1) बँक एफडीवरील नियमांत बदल
जर तुम्ही मुदत ठेव (Fixed Deposit – FD) मध्ये गुंतवणूक करत असाल, तर हे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मार्च 2025 पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे व्याजदर, कर नियम आणि पैसे काढण्याच्या पद्धतींमध्ये काही फरक पडणार आहे. बँका आता त्यांच्या आर्थिक गरजेनुसार व्याजदरात अधिक लवचिकता ठेवू शकतात, त्यामुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम 5 वर्षे किंवा त्याहून कमी कालावधीसाठी एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांवर होऊ शकतो.
2) एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल
तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीचा आढावा घेतात. त्यानुसार , 1 मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ किंवा कपात होऊ शकते. नवीन दर सकाळी 6 वाजता जाहीर केले जातील.
3) ATF आणि CNG-PNG दरांमध्ये संभाव्य बदल
विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) तसेच संकुचित नैसर्गिक वायू (CNG) आणि पाइपलाइन नैसर्गिक वायू (PNG) यांच्या दरांमध्ये देखील दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारणा केली जाते. त्यामुळे 1 मार्चपासून या इंधनाच्या किमती वाढणार की कमी होणार, याकडे वाहनचालक आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. इंधनदर वाढल्यास प्रवासी आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे.
4) म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांसाठी नवे नियम
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) ने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. 1 मार्चपासून या नियमांनुसार नामांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मालमत्ता हस्तांतरित करताना अधिक सोयीस्कर प्रक्रिया असेल. यामुळे गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता आणि पारदर्शकता निर्माण होईल.