औरंगाबाद | एक-एक रुपये जमा करून उपचारासाठी औरंगाबादला आलेल्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्याने कापून पळवले. यामुळे शेतकरी मोठया अडचणीत आला आहे. ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून एमआयडिसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, प्रल्हाद सखाराम नंन्नेरे (वय-56) हे लोणार तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांचा व्यवसाय शेती असून पत्नी, सून, मुलांसह शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मागील काही दिवसापासून त्यांना आजार जडला होता. त्यासाठी स्थानिक डॉक्टरांना दाखवले मात्र गावात उपचार होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथील दवाखान्यात दाखवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार नंन्नेरे यांनी औरंगाबाद येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू केले. दम्याचा आजार असल्याने उपचार महाग आहेत. त्यासाठी त्यांना शेतीचे उत्पन्न अपुरे असल्याने त्यांनी नातेवाईकांकडून पैसे गोळा करून एक लाख रुपये जमविले. आणि ते लोणार वरून औरंगाबादकडे निघाले त्यांनी पैशांची बॅग बस मधील जाळीत ठेवली होती. औरंगाबादेत सिडको बस स्थानकावर उतरताच त्यांना चोरट्यांनी बॅक कापून पैसे लंपास केल्याचा प्रकार लक्षात आला. एवढी मोठी रक्कम चोरीला गेल्याने नंन्नेरे यांना धक्का बसला. त्यांनी आजूबाजूच्या प्रवासी, वाहक, वाहन चालक यांना सर्वांना विचारपूस केली मात्र चोरट्यांचा काही पत्ता लागला नाही.