सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
साताऱ्यातील ग्रेडसेपरेटर हा लोकांच्या माथ्यावर मारण्यात आलेला आहे. लहरीपणाचे हे काम आहे, बाकी काही नाही. मी काही तरी करतोय आणि तेच योग्य आहे. अशा पध्दतीने हा ग्रेडसेपरेटर झाला. नुसतं बोर्ड लावायचे आणि संकल्पना म्हणून स्वतः च नाव टाकायचं. स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे, असे टीका आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता केली.
सातारा येथील बाल गणेश गणेश मित्र मंडळ रविवार पेठ, सातारा यांनी नवरात्री निमित्त हाॅरर शो दाखविण्यासाठी ग्रेडसेपरेटर भाड्याने मागितला आहे. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी खा. छ. उदयनराजे भोसले यांचे नांव न घेता जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, शाहू चाैकाकडून येणारा रस्ता हा कलेक्टर चाैकात जाणे गरजेचे होते. कारण कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय सगळं तिकडे आहे. उलट हा रस्ता गेला एसटी बसस्थानकाकडे ज्यांचा काही उपयोग होत नाही. अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक याचा वापर करत आहेत.
मंडळाच्या कार्यकर्त्यांना सलामच केला पाहिजे
सगळं काम सगळा पैसा वाया गेला आहे. कुठेही सातारकरांच्या हे काम उपयोगी येत नाही. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपहासत्मक ग्रेडसेपरेटर भाड्याने मागण्याचा अर्ज दिला आहे. त्याच्या अर्जामुळे वायफळ झालेला खर्च समोर आणला आहे. त्यामुळे सातारकरांची भावना बोलल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना सलामच केला पाहिजे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.