हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “माझी लाडकी बहीण” (Ladaki Bahin Yojana) योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेचे जानेवारीपर्यंत महिलांना सात हप्ते देण्यात आले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही पैसे आले नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर हा तांत्रिक अडचणींमुळे होत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासकीय स्तरावर काही अडथळे आल्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप पैसे वर्ग करता आलेले नाहीत. याशिवाय, महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जमा केला जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही महिलांचे अर्ज तपासणी प्रक्रियेतच असल्याने त्यांना फेब्रुवारीचा हप्ता थोड्या उशिराने मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे, या योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिले होते की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल. या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला असून योग्य वेळी तो लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र, प्रत्यक्षात फेब्रुवारीचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे हजारो महिलांना आता या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
हप्ता मार्चमध्ये मिळण्याची शक्यता
खरे तर, फेब्रुवारी महिन्यात ८वा हप्ता वितरित केला जाणार होता. मात्र, आता तांत्रिक अडचणी आणि पडताळणीची प्रक्रिया लक्षात घेता हा हप्ता मार्च महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबतची कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होईल याबाबत कोणतेही ठोस माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. मात्र, वेळेवर हप्ता न मिळाल्यास महिलांच्या आर्थिक नियोजनावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.