Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून ‘या’ महिला उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकतायत; विश्लेषण पाहा

Women MP in maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार…. महिला विरुद्ध महिला… अशी लढत बघायला मिळणारा बारामतीचा एकमेव मतदारसंघ… यंदा राज्यात अनेक दिग्गज महिला नेत्यांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं. तर अगदी नवख्या महिला उमेदवारही अगदी तगड्या प्रतिस्पर्ध्याला भिडताना दिसल्या…पण पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचा अंदाज येऊ लागलाय…म्हणूनच महाराष्ट्रातील किती महिला यंदा लोकसभेत पाहायला मिळतील? कुठल्या महिला घासून तर कुठल्या ठासून खासदार होतायत? त्यामागची नेमकी कारणं काय? याचं सविस्तर विश्लेषण पाहुयात,

महाराष्ट्राचंच नाही तर पुऱ्या देशाच्या नजरा ज्या लढतीकडे लागून राहिल्या आहेत त्या बारामतीतून महिला उमेदवार लोकसभेत जाणार, हे तर फिक्स आहे. फक्त कुठल्या राष्ट्रवादीच्या हा खरा प्रश्न आहे? कारण बारामतीचं मतदान अपेक्षेपेक्षा घासून झालं. असं सरळ साधं समीकरण मांडून कोण जिंकून येईल, हे सांगता येणार नाही. पण शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट वर्कआउट झाल्याचं अनेक बारामतीकर सांगतायत. त्यामुळे राज्यातील सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतील याचे जास्त चान्सेस आहेत. महिला प्रश्नांपासून ते अनेक पॉलिसी लेवलच्या डिबेटमध्ये त्या संसदेत सहभागी होत असल्याने महाराष्ट्रातील एक प्रॉमिनंट महिला खासदार म्हणून त्यांची या आधीच ओळख आहे…

आता वळूयात मुंबईकडे. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी या भाजपच्या हेमंत सावरा यांच्या विरोधात लढत देतायेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटात पालघरच्या जागेबाबत कमालीचा आत्मविश्वास होता. विकासाचं राजकारण हा निवडणूक प्रचारातला सेंटर पॉइंट ठेवून भारती कामडी यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. भूमिपुत्रांचं संरक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी त्यांनी मतदारसंघात बजावलेली भूमिका हे सगळं त्यांना प्लसमध्ये घेऊन गेलं. त्यामुळे ठाकरे गटाचं युवा नेतृत्व भारती कामडी या संसदेत या प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसल्या. तर आश्चर्य वाटायला नको.

दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव ठाकरेंच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात उभ्या असल्या तरी इथे मशालीचं पारड जड दिसतंय. पण उत्तर मध्य मध्ये एक इंटरेस्टिंग फाईट पाहायला मिळतेय. उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी. अगदी झिरो अव्हरला दोघांचीही उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला तसा कमी टाईम मिळाला. सरकारी खटल्यांचा निकमांचा चांगला अभ्यास असला तरी आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपदावर असल्यानं वर्षा गायकवाड यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यात दक्षिण मध्य मध्ये मविआची ताकद आणि ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याने इथून वर्षा गायकवाड यांची खासदारकी फिक्स समजली जातेय. मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आपल्या कल्याणच्या बालेकिल्ल्यातून पुन्हा एकदा हॅट्रिकसाठी मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात ठाकरेंनी अनपेक्षितपणे माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना तिकिट देऊ केलं. विकासकामांच्या जोरावर श्रीकांत शिंदे प्लसमध्ये असले तरी मतदानानंतर इथे दोघांनाही फिफ्टी-फिफ्टी चान्स दिसतायेत. म्हणून 4 जूनला कल्याणच्या पुढच्या खासदार वैशाली दरेकर झाल्या, तर आश्चर्य वाटायला नको…

पश्चिम महाराष्ट्रात बारामती सोडता सोलापुरातही महिला उमेदवार आहेत. भाजपच्या राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने इथला दलित आणि मुस्लिम व्होट बँक यंदा काँग्रेसच्या पाठीशी पाहायला मिळाली. सलग दोन टर्म भाजप इथून सरशी मारत असली तरी यंदा प्रणिती शिंदे खासदार होण्याचे चान्सेस वाढलेत. उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर इथे तब्बल चार महिला उमेदवार होत्या. त्यात जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा मशालीकडून पराभव होईल, असं चित्र आहे. तर दिंडोरीतून अनुभवी खासदार राहिलेल्या भाजपच्या भारती पवार यांच्यापेक्षा तुतारीचा आवाज हा जास्त दिसला…पण नंदुरबारमधून हिना गावित तर रावेरमधून रक्षा खडसे आपली खासदारकी कायम टिकवताना दिसत असल्याने उत्तर महाराष्ट्रातून भाजपच्या दोन महिला खासदार दिसतील, असं सध्या चित्रं आहे…

मराठवाड्यात केवळ दोनच जागांवर महिला उमेदवार उभ्या आहेत. त्यात धाराशिवमध्ये घडलेल्या नाट्यमय घटनाानंतर भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेऊन मशालीच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढत दिली. पण इथे ओमराजे म्हणजेच मशालीचंच पारड जड दिसतय. तर राजकीय पुनर्वसनासाठी बीडमधून पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरुवातीला घोडे मैदान सोपं वाटत असताना जातीय समीकरण आणि शरद पवार फॅक्टर यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे तुतारी वाजवणार, हे जवळपास कन्फर्म समजलं जातंय…

विदर्भातही केवळ तीनच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यात यवतमाळमधून ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या विरोधात शिंदेंनी राजश्री पाटील यांना तिकीट दिलं होतं. पण मशाल इथेही जोरात असल्याने राजश्री पाटील यांच्या जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत. तर नवनीत राणा यांनी खासदारकीची पहिली टर्म गाजवली असली तरी अमरावतीत वातावरण फिरलय, असं पहिल्या दिवसापासून बोललं जात होतं. त्यामुळे इथे काँग्रेसचे बळवंत वानखडे लीड घेतील, असा एक अंदाज आहे. आता येऊयात शेवटच्या लढतीकडे तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी चंद्रपूरची निवडणूक झाली. मुनगंटीवारांसारख्या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्याला लोकसभेच्या मैदानात उतरवूनही इथं हाताच्या पंजाची प्रेस पाहायला मिळाली. मतदार संघातील काँग्रेसचा मजबूत केडर, महाविकास आघाडीनं एकदिलाने लावलेली ताकद हे सगळं बघितलं तर विदर्भातून दिल्लीत जाणाऱ्या प्रतिभा धानोरकर या एकमेव खासदार असतील, असं इथलं चित्र आहे…

साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शरद पवार गटाच्या एक, काँग्रेसच्या दोन, भाजपच्या दोन तर ठाकरे गटाच्या दोन खासदार 2024 ला दिल्लीत दिसतील, असं सध्याच्या घडीला सांगता येऊ शकतं. म्हणजेच एकट्या महाराष्ट्रातून सात ते आठ महिला खासदार असतील, असं म्हणायला हरकत नाही… बाकी महाराष्ट्रातल्या कुठल्या महिला उमेदवारांना तुम्हाला संसदेत खासदार होताना पाहायला आवडेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.