अखेर ठरलं! यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीसांच्याच हस्ते होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. परिणामी यंदाची कार्तिकी पूजा राज्यातील कोणत्याही राजकीय पुढार्‍याच्या हस्ते होऊ नये, अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली होती. तसेच, कार्तिकी एकादशीच्या महापूजेवेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागाला देखील विरोध दर्शवण्यात आला होता. परंतु या सगळ्या वादाअंती काल मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीची महापूजा फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मंगळवारी जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मराठा समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा यंदाच्या एकादशीला महापूजा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे येत्या 23 नोव्हेंबर रोजी चालत आलेल्या परंपरेनुसार देवेंद्र फडणवीस पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा करणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. कार्तिकी पूजेसाठी फडणवीस 22 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता पंढरपूरात येणार आहेत. त्यानंतर पहाटे अडीज वाजता महापूजा सुरू करण्यात येईल.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यामुळे यंदाची कार्तिकी पूजा गृहमंत्र्यांऐवजी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व्हावी, अशी मागणी मराठा बांधवांकडून करण्यात आली होती. त्यामुळे यंदा कार्तिकी पूजेचा मान कोणाला देण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आता हा मान देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.