यंदाचा उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत यंदाचा उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा ऊसाच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा पाच टक्के घट होणार आहे.

यावर्षी राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता  1 नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. यापूर्वी गळीत हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र दुसऱ्या बाजूला गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात येत होती. अखेर सरकारने मधला मार्ग काढत 1 नोव्हेंबर तारीख उसाच्या गळीत हंगामासाठी ठरवली आहे.

दरम्यान, यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर पडला आहे. यामध्ये परतीचा पाऊस ही न पडल्यामुळे माळरानावरील ऊस पिके अडचणीत सापडली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे यंदा ऊस उत्पादकांसह कारखान्यांची पुरती दमछाक उडणार आहे.