डीवाय पाटील महाविद्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

DY Patil College
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथील डॉ. डीवाय पाटील महाविद्यालयाला (DY Patil Collage) बॉम्बने (Bomb Threat) उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने महाविद्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ सुरक्षा व्यवस्था तैनात करत शोधमोहीम राबवली. मात्र, पोलिसांच्या तपासात ही धमकी खोटी असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास डीवाय पाटील महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर संशयास्पद ई-मेल आला होता. ज्यामध्ये महाविद्यालय बॉम्बने उडवण्यात येईल असे स्पष्टपणे लिहिले होते. हा ई-मेल मिळताच प्रशासनाने कोणतीही रिस्क न घेता तात्काळ पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक (BDDS) आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी पाठवले. तसेच, महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाची कसून तपासणी सुरू करण्यात आली. पुढे, सुरक्षा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना देखील वर्गाबाहेर काढण्यात आले, या घटनेवेळी महाविद्यालयात परीक्षा सुरू होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आणि परीक्षेत अडथळा निर्माण झाला.

महत्वाचे म्हणजे, बीडीएस पथक आणि डॉग स्क्वॉडने संपूर्ण कॅम्पसची तपासणी केल्यानंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नाही. त्यामुळे हा प्रकार कोणीतरी मुद्दामून घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कारण की, यापूर्वी देखील पोलिसांना अशा प्रकारचे मेल हाती लागले होते. परंतु तपासामध्ये त्यांना काहीही निष्पन्न झाले नाही.

दरम्यान, या प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “अशा बनावट धमक्या समाजात भीती पसरवण्यासाठी दिल्या जातात. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.