तीनदिवसीय सुरजागड यात्रा महोत्सव संपन्न; सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण, विविध समस्यांवर मंथन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एटापल्ली : तालुक्यातील प्रशिद्ध सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरात आदिवासींचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देव यात्रा महोत्सव पाच जानेवारी ते सात जानेवारी अशा तीन दिवसांत यात्रा सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण व विविध सामाजिक समस्यांवर विचार मंथन करून उत्साहात संपन्न झाला आहे.

आदिवासी थोर योद्धा स्वातंत्र्य सेनानी विर बाबूराव सेडमाके यांचे वास्तवाने पावन व आदिवासी समाजाचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देवाचे श्रद्धा स्थान, मौलीक व जागतिक दर्जाचे लोहखनीज युक्त सुरजागड पहाड़ी परिसरात गेली शेकडो वर्षापासून यात्रा महोत्सवाचे आयोजन सुरजागड हलका पारंपरिक पट्टीच्या वतीने केले जाते.

सुरजागड लोहखनीज गड हा आदिवासींच्या रूढ़ी, पारंपारिक, कला, सांकृतिक, सामाजिक उद्बोधनाचे केंद्र असून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील तथा लगतचे छत्तीसगड़, तेलंगाना व आंध्रप्रदेश राज्यातील आदिवासी बांधव मोठया संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. तीन दिवस होणाऱ्या यात्रा महोत्सवात रूढ़ीपरंपरागत निसर्ग, देवी दैवतांचे पूजन, सांस्कृतिक कला महोत्सव व इलाका पट्टीच्या नागरिकांचे महाचर्चा सत्र घेण्यात आले.

यावेळी सामाजिक समस्या, नागरिकांच्या भौतिक सोयी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा समस्यांच्या उपाययोजनावर तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व रक्षण अशा विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शनातून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, बिरसा ब्रिगेट संयोजक इंजिनिअर सतीश पेंदाम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ग्रामसभांचे प्रतिनिधी तथा जिल्हा परिषद माजी सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, मंगेश नरोटी, अमोल मारकवार, सैनू हिचामी, व आदी मान्यवरांकडून मत व्यक्त करण्यात आले. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.