दक्षिणेत भाजपला मिळाला नवा मित्र; लोकसभेला होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. देशात भाजपप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूनी जागावाटप, निवडणूक प्रचार रणनीती यावर काम केलं जात आहे. त्याच दरम्यान, भाजपासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारतात भाजपला एक नवा मित्रपक्ष मिळाला आहे. तामिळनाडू राज्यात तामिळ मनिला काँग्रेस पक्षाने (Tamil Maanila Congress) भाजपसाठी युती (TMC- BJP Allliance) केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जीके वासन यांनी या युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे दक्षिणेत कमकुवत असलेल्या भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

जीके वासन म्हणाले, आज देशाची आर्थिक वाढ आणि सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. गरीब लोकांचे उत्थान अधिक महत्त्वाचे आहे, देशातील पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनणार आहोत. या सर्व गोष्टी एकत्र करणारे सरकार TMC ला हवे आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका तमिळ मनिला काँग्रेस भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचा भाग म्हणून लढवणार आहे असं त्यांनी म्हंटल.

खरं तर तामिळ मनिला काँग्रेस हा राज्यात अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष आहे. 2019 च्या निवडणुकीत हा पक्ष एनडीएचा भाग होता, परंतु त्यांची भाजपशी थेट मैत्री नव्हती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तमिळ मनिला काँग्रेसनेही भाजपपासून दूर राहावे, अशी अपेक्षा होती. पण सुमारे पाच महिन्यांनंतर तामिळ मनिला काँग्रेसने राज्यातील आपल्या मित्रपक्षाला सोडून भाजपसोबत निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे.

या युतींनंतर तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हंटल, भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, असे भाजपच्या विरोधात नॅरेटिव्ह करण्यात येत आहे, मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही हे नॅरेटिव्ह मोडून काढेन. तामिळनाडू मध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकांना सामोरे जात आहोत. त्यासाठी छोट्या छोट्या पक्षांशी युती करण्याचा आमचा प्रयत्न असून राज्यात भाजपची ताकद वाढत आहे.