धडक चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर घुसला घरात; चालक गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

फलटण येथील फलटण-पंढरपूर रस्त्यावर विडनी जवळच्या अबदागिरी वाडीत समोरासमोर होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात असलेला एक ट्रॅक्टर भिंत तोडून घरात घुसला. या अपघातात एक ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने घरातील लोक घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली.

आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, फलटणहून पिंपरदकडे एक ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर निघाला होता. तर माळशिरसहून फलटणकडे खत वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर (एमएच 13, एजे 5324) भरधाव वेगात निघाला होता. विडणी हद्दीतील अब्दागिरेवाडीजवळ या दोन ट्रॅक्टरची समोरा समोर धडक होत होती.

मात्र, ही धडक चुकवण्याचा प्रयत्न चालकाने केला. मात्र, त्यावेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो महामार्गालगत असलेल्या सतीश अब्दागिरे यांच्या घरात घुसला. यात चालक गंभीर जखमी झाला. तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी ट्रक चालकास तसेच पाठीमागील ट्रेलर मधील एक व्यक्तीला खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले आहे. अपघाताची माहिती विडणीच्या पोलिस पाटील शितल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर तत्काळ फलटण ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.